उशिरा पोहोचलेले भावी गुरुजी पात्रता परीक्षेपूर्वीच अपात्र

मंगेश शेवाळकर
रविवार, 15 जुलै 2018

शिक्षक पात्रता परीक्षेत रविवारी (ता. 15) परीक्षा केंद्रावर उशिराने पोहोचणाऱ्या सुमारे शंभर उमेदवारांना पात्रता परिक्षा देण्यापूर्वी अपात्र व्‍हावे लागले आहे.

हिंगोली - येथे महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेत रविवारी (ता. 15) परीक्षा केंद्रावर उशिराने पोहोचणाऱ्या सुमारे शंभर उमेदवारांना पात्रता परिक्षा देण्यापूर्वी अपात्र व्‍हावे लागले आहे. यावेळी उमेदवारांनी रास्‍तारोको आंदोलन करून परीक्षेला बसू देण्याची मागणी केली. मात्र त्‍यांची मागणी फेटाळून लावण्यात आली.

येथील महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे आज शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सात परीक्षा केंद्रांवर दोन हजार 167 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्‍यासाठी सकाळच्‍या सत्रामध्ये सरजूदेवी कन्या विद्यालय, माणिक स्‍मारक विद्यालय, आदर्श महाविद्यालय 'अ' व 'ब' असे चार परीक्षा केंद्र निवडण्यात आले होते. उमेदवारांनी या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी वीस मिनिटे अगोदर उपस्‍थित राहणे आवश्यक होते. दरम्‍यान, परीक्षा परिषदेच्‍या सूचनेनुसार येथील माणिक स्‍मारक विद्यालयाच्‍या परीक्षा केंद्रावर दहा वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्‍यामुळे शंभरपेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षा केंद्रात जाता आले नाही. या प्रकारामुळे उमेदवारांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयाजवळ रास्‍तारोको सुरु केला.

काही वेळातच आमदार डॉ. संतोष टारफे तिथे आले. विद्यार्थ्यांसोबत त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय गाठले. त्‍या ठिकाणावरून प्रशासनाच्‍या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्‍या आदेशानुसारच परीक्षा घेतल्‍या जात असल्‍याचे सांगितल्‍यानंतर आमदार डॉ. टारफेंना माघार घ्यावी लागली. उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्‍त करून जिल्‍हाधिकारी कार्यालय सोडले. केवळ दहा मिनिटे उशिरा पोहोचल्‍यामुळे सुमारे शंभर उमेदवारांना पात्रता परीक्षेपासूनच वंचित रहावे लागले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A hundred candidates have to be disqualified before giving teacher eligibility exams