रस्त्यावर वेफर्सचे रॅपर्स फेकणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यापूर्वीही रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अनेकांना दंड केला आहे. बुधवारी दुपारी आयुक्त टीव्ही सेंटर भागातून जात होते. यावेळी एका दुचाकीस्वार तरुणाने वेफर्सचे रिकामे रॅपर्स रस्त्यावर टाकले. हा प्रकार आयुक्तांच्या लक्षात येताच त्यांनी वाहन थांबविले. दुचाकीस्वारास थांबवून वेफर्सचे रिकामे रॅपर्स रस्त्यावर टाकल्याबद्दल शंभर रुपये दंडाची पावती दिली.

औरंगाबाद - रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने अनेक नियम करून ठेवले आहेत; मात्र हे नियम कागदावरच राहतात. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागला. बुधवारी (ता. २६) रस्त्यावर रॅपर्स फेकणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला थांबवून आयुक्‍तांनी त्याच्याकडून शंभर रुपये दंड वसूल केला. 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यापूर्वीही रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अनेकांना दंड केला आहे. बुधवारी दुपारी आयुक्त टीव्ही सेंटर भागातून जात होते. यावेळी एका दुचाकीस्वार तरुणाने वेफर्सचे रिकामे रॅपर्स रस्त्यावर टाकले. हा प्रकार आयुक्तांच्या लक्षात येताच त्यांनी वाहन थांबविले. त्यानंतर वाहनात असलेले स्वीय सहायक शंकर मरापे व पोलिस कर्मचाऱ्यांनी दुचाकीस्वारास थांबवून वेफर्सचे रिकामे रॅपर्स रस्त्यावर टाकल्याबद्दल शंभर रुपये दंडाची पावती दिली. त्याच्याकडून शंभर रुपये वसूलही करण्यात आले. या कारवाईचे छायाचित्र आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोशल मीडियावर टाकले. त्यात तरुणाला दंड आकारल्यामुळे किमान यापुढे तो तरुण असे कृत्य करणार नाही. संपूर्ण शहर काय डस्टबिन वाटले का? अशी कॉमेंट त्यांनी केली आहे. 

आयुक्तांची तत्परता; कर्मचाऱ्यांचे काय? 
रस्त्यावर कचरा करणाऱ्यावर आयुक्तांनी तत्परतेने कारवाई केली; मात्र जे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेने दिली आहे, ते आयुक्तांप्रमाणेच तत्परता दाखवून कारवाई करतील काय, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. शहरात बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिद्धार्थ उद्यान, बिबी-का-मकबरा, बुद्ध लेणी यांसह इतर सार्वजनिक ठिकाणी अनेकजण सर्रास कचरा करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही आगारप्रमुख, स्थानकप्रमुख, पुरातत्त्व विभाग यांची आहे. या ठिकाणी कचरा करणारे सीसीटीव्हीत कैद होतात; तिथेही तत्परतेने कारवाई करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A hundred rupees fine for throwing empty rappers on the road