शेती व्यवसायाला हुरडा पार्टीचा आधार   

प्रकाश बनकर
मंगळवार, 22 जानेवारी 2019

औरंगाबाद : पावसावर अवलंबून असणारा शेती व्यवसाय जगण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हुरडा पार्टी व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय शहरवासीयांना शेतकऱ्यांचा अनुभव देणारा तर शेतकऱ्यांना आधार देणारा ठरत आहे. 

औरंगाबाद : पावसावर अवलंबून असणारा शेती व्यवसाय जगण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हुरडा पार्टी व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय शहरवासीयांना शेतकऱ्यांचा अनुभव देणारा तर शेतकऱ्यांना आधार देणारा ठरत आहे. 

जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, फुलंब्री तालुक्‍यासह शहराच्या परिसरातही काही शेतकऱ्यांनी हुरडा पार्टी व्यवसाय सुरू केला आहे. पारंपरिक पीक पद्धतीबरोबर पालेभाज्यांचे पीक घेत शेती जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांतर्फे होत आहे. शहर परिसरात पाणी उपलब्ध असणारे शेतकरी पालेभाज्यांसह आता हुरडा पार्टी व्यवसायाकडे वळत आहेत. पारंपरिक व्यवसायापेक्षा दोन पैसे जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी याकडे वळला आहे. पैठण तालुक्‍यातील बिडकीन, शहर परिसरातील पळशी-पोखरी, जालना रोडवरील चिकलठाणा, शेंद्रा परिसर, बीड बायपासवरील सातारा-देवाळाई परिसर, खुलताबाद तालुक्‍यातील विविध पिकनिक स्पॉटवर हुरडा पार्ट्या रंगत आहेत. 

ग्रामीण जीवनाचे दर्शन 
हुरड्यासोबत शेतकऱ्यांशी निगडित असलेली बैलगाडीतील सैर, बैलांसोबत फोटो, घोडेस्वारी, उंटस्वारी, बोर, जाम, पपई, मका यासह वेगवेगळे ताजे खाद्यपदार्थ खवय्यांना खायला मिळत आहेत. याशिवाय लहान मुलांसाठी खेळणी, इतर गोष्टीही या हुरडा पार्टीत उपलब्ध असल्याने शहरवासीयांचा हुरडा पार्टीचा आनंद घेण्याकडे कल वाढला आहे. दुष्काळ, पिकांवरील विविध रोगराईमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना हा हुरडा पार्टी उद्योग नवी दिशा देणारा ठरत आहे. यासह प्रत्येक हुरडा पार्टीच्या ठिकाणी 40 ते 50 युवक, महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध होत आहे.

Web Title: Hurda Party supports agriculture