विद्यापीठाची परीक्षा घेणार कशी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत.

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी महाविद्यालयात कार्यरत असताना दोन हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची कशी, असा पेच महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे. याबाबत सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पांडे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत मंगळवारी (ता. आठ) सायंकाळी उशिरा कळविण्यात आले आहे.

येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 47 कर्मचारी आहेत. यातील 42 कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. यात कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर या विभागांचा समावेश आहे. महाविद्यालयात साधारणतः दोन हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पाच कर्मचारी असताना परीक्षा घ्यायची कशी, असा पेच महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पन्नास टक्के कर्मचारी निवडणुकीसाठी घ्यावेत; जेणेकरून परीक्षा घेताना अडचणी येणार नाहीत, अशी विनंती प्रशासनाकडे वारंवार केली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता गुरुवारपासून होणाऱ्या परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करावी, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे यांनी सांगितले. याविषयी सोयगावचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पांडे यांना विचारणा केली असता महाविद्यालयाची अडचण जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आली आहे. परीक्षा आणि निवडणुकीचे काम हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. यावर जिल्हाधिकारीच निर्णय घेतील, असे पांडे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hurdles In University Examination