पतीच्या निधनानंतर ट्रकचालक योगीताने दिली व्यवसायाला उभारी!

yogita track.jpg
yogita track.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : सर्व क्षेत्रात महिला सन्मानाने काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. ट्रक व्यवसायात स्वतः चालक, मालक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून काम करणारी योगिता रघुवंशी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळ नंदूरबागची राहणारी योगिता सध्या भोपाळमध्ये वास्तव्यास असणारी योगिता बुधवारी (ता.चार) उमरगा येथून भाड्याने माल घेऊन जाण्यासाठी आली होती. त्या वेळी तिने आपल्या जीवनपटाचा उलगडा केला.


महिलांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योग, गृहउद्योगातून स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. भोपाळची योगिताने बी. कॉम.पदवी घेऊन कायद्याची पदवी घेतली. पती भोपाळच्या न्यायालयात प्रॅक्टिस करत ट्रक व्यवसाय सुरू केला होता.  मात्र पतीच्या अकाली निधनानंतर योगितावर मोठी जबाबदारी आली. कांही दिवस तिने न्यायालयात प्रॅक्टीसही केली. परंतु घरचा ट्रक व्यवसाय थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठ्या धाडसाने स्वतः चालक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून त्या राज्य, परराज्यात जाताहेत. एक महिला म्हणून चोविस तास रोडलाईनवर काम करणाऱ्या योगिताचा हा प्रवास कोणत्याही क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान योगिताच्या धाडसाचे कौतूक म्हणून महिंद्रा कंपनीने ट्रक भेट दिला आहे, शिवाय योगिताकडे आणखी एक ट्रक आहे.

ट्रक व्यवसायधारकावर अतिरीक्त कराचा बोजा नको !

दहा, पंधरा वर्षापूर्वीचा ट्रक व्यवसाय आणि आताची स्थिती याबाबत योगिताने भाष्य केले. दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून ट्रक व्यवसाय महत्वाचा आहे. डिझेलचे वाढलेले दर, टोल टॅक्स, रोड टॅक्सचा दुहेरी बोजा आणि महामार्गावरील आरटीओ कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक या बाबीमुळे व्यवसायातुन अधिक रक्कम शिल्लक रहात नाही. कांही जणांनी हा व्यवसाय मोडीत काढला. केंद्र व राज्य सरकारने ट्रक व्यावसायिकांसाठी सवलत दिली तर हा व्यवसाय टिकून राहिल. अशी अपेक्षा व्यक्त केली.

व्यवसाय बंधूंनी केला योगिताचा सत्कार

राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर -चौरस्ता येथील ट्रक व्यवसाय बंधूंनी ट्रक चालक म्हणून धाडसाने काम करणाऱ्या योगिताचा चंद्रशेखर पवार, विजय पवार, शंतनू (भैय्या) सगर, संदीप जाधव, उमेश बिराजदार, अनिल राठोड, सतीश राठोड आदींनी सत्कार केला. आणि प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

" जीवनामध्ये आलेल्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ महिलामध्ये असायला हवे. क्षेत्र कोणतेही असो, तेथे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची असते. ट्रक व्यवसायात आता कांही उरले नाही मात्र करण्याची जिद्द असेल तर कांही तरी पदरात पडते. ज्या महिलांना या क्षेत्रात यायचे असेल तर मी त्यांना प्रशिक्षण देईन. - योगिता रघूवंशी, ट्रकचालक- मालक

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com