पत्नीचा खून करून गाठले पोलिस ठाणे, खुनाची दिली कबुली

crime
crime

उमरगा ः तालुक्यातील माडज येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) पहाटेच्या सुमारास घडली. खून करून थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीचा खून केल्याची कबुली पतीने दिली. पोलिस सकाळपासुन घटनास्थळावर होते, खून करण्याचे कारण शोधले जात असून, अद्याप स्पष्ट कारण समोर आले नव्हते. दरम्यान आजाराने अंथरूणावर वडिलाचाही मृत्यू झाला.

माडज येथील पुनर्वसित गावात गहेरवार कुटुंबाची घरे आहेत. मोहनसिंग महाबीरसिंग गहेरवार (वय ४८) यांचे घर आहे. मोहनसिंग भिगवणला एमआयडीसीमध्ये कामाला आहेत. सुटीनिमित्त ते गावाकडे आले होते. त्यांचा एक मुलगा औरंगाबादला शिक्षणासाठी आहे तर मुलीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले आहे. सध्या पती - पत्नीच राहात होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोहनसिंग याने घरात पत्नी अनुसयाचा गळा दाबून खून केला. दोनशे फुटांच्या अंतरावर मोहनसिंगच्या आई - वाडिलांचे स्वंतत्र घर आहे. याच दरम्यानच्या काळात आजारी असलेले वडील महाबीरसिंग गुलजारसिंग गहेरवार (वय ७५) यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर मोहनसिंगने गावातच राहणाऱ्या आत्याला दुचाकीवरून वडिलाच्या घरी आणून सोडले आणि तो दुसऱ्या वाहनाने पोलिस ठाणे गाठुन पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी नेमक्या प्रकारची खात्री करण्यासाठी पोलिसपाटील मारूती कुंभार यांच्याशी संपर्क साधला, श्री. कुंभार यांनी मोहनसिंगच्या घराकडे धाव घेतली. तेथे अनुसया मृतावस्थेत आढळून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती सांगण्यात आली. तेथून पोलिस यंत्रणेची धावपळ सुरु झाली. तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे, सहायक पोलिस निरीक्षक मंजुषा सानप, पोलिस उपनिरीक्षक विशाल भोसले, सुभाष माने, विजयकुमार वाघ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 

दरम्यान, एकीकडे अनुसयाचा खून तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक महाबीरसिंगचा आजाराने झालेला मृत्यू या दोन्ही घटनेमुळे गहेरवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; ग्रामस्थही या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करीत होते. मोहनसिंगने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली असली तरी त्या मागची कारणमिमांसा पोलिस शोधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com