"मलाच पाहिजे' हे आजचे राजकारण : बाबा भांड

baba bhand news
baba bhand news

लातूर : "मलाच पाहिजे' असे स्वार्थी आणि जात-धर्माला महत्त्व देणारे आजचे राजकारण आहे. या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ प्रकाशक-लेखक बाबा भांड यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. जनकल्याण हेच खरे मोक्ष आहे, असे मानून आयुष्यभर लोकसेवा करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे खरे युगपुरुष होते. त्यांचे विचारकार्य आजच्या पिढीने आपल्या डोळ्यांसमोर ठेवावे, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने "महाराजा सयाजीराव गायकवाड ः विचार आणि कार्य' या विषयावर सोमवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बाबा भांड बोलत होते. यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. कुसुम मोरे उपस्थित होत्या. 

शिक्षणासाठी भरीव कार्य
भांड म्हणाले, सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीशिक्षणाचा कायदा केला. रात्रशाळा सुरू केल्या. राणीला शिक्षण देत घरातूनच प्रौढ शिक्षणालाही सुरवात केली. इतके करूनही अनेकजण शाळेला येत नाहीत म्हणून 1892 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा तयार केला.

आदिवासी मुलांना मोफत शिक्षण दिले. शिक्षणाबरोबरच धर्म, शेती, दुष्काळ, साहित्य, कला, संस्कृती, पर्यटन, ग्रंथालय अशा नानाविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण काम केले. त्यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. ते जेव्हा गादीवर आले तेव्हा संस्थानावर 27 लाखांचा बोजा होता; पण उत्तम प्रशासन करत ते जगातले सातवे सर्वांत श्रीमंत राजे बनले. 

जातपात मानली नाही
सामाजिक सुधारणांची कामे करून सयाजीराव गायकवाड यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ते अभ्यासू राजे, प्रज्ञावंत राजे होते. त्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. गांधी-आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांना त्यांनीच मदत केली होती. त्यांचे अद्‌भुत कार्य नव्या पिढीला कळले पाहिजे, असे भांड यांनी सांगितले.

वाघमारे म्हणाले, शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी सबंध आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी घालवले. त्यामुळे आपला वारसा काय, हे आपण विसरता कामा नये. विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com