गुड टच, बॅड टच ओळखा आणि कळवा...

गुड टच, बॅड टच ओळखा आणि कळवा...

औरंगाबाद -  कुणी व्यक्ती लैंगिक भावनेतून स्पर्श करीत असेल, पाठलाग करीत असेल, आमिष दाखवून अथवा कुटुंबातील व्यक्तींना इजा करण्याची धमकी देत जवळीक साधत असेल तर अशी प्रवृत्ती ओळखा. त्यांची माहिती संरक्षणासाठी सज्ज असलेल्या पोलिस दीदी, पोलिस दादांना द्या, असे आवाहन पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे पोलिस दादा-पोलिस दीदी या संकल्पनेची सुरवात मंगळवारी (ता. 16) निपाणी फाटा येथील उज्ज्वलाताई पवार शाळेतून करण्यात आली. त्यावेळी श्रीमती पाटील विद्यार्थ्यांशी हितगुज साधत होत्या. त्यांच्याहस्ते शाळेत संकल्पनेचे बॅनर लावून उद्‌घाटन करण्यात आले.

अधीक्षक पाटील म्हणाल्या, की विद्यार्थी-विद्यार्थिनींना गर्दीच्या ठिकाणी, शाळेत अथवा इतरत्र जावे लागते. त्यावेळी कोणताही प्रसंग उद्‌भवू शकतो, अकारण कुणी स्पर्श करीत असेल, पाठलाग करीत असेल तर मुलींनी घाबरून जाऊ नये. याची माहिती पालकांना किंवा शाळेतील शिक्षक, मित्र-मैत्रिणींना द्यावी. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी निडरपणे पोलिस ठाण्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दादा व दीदींना संपर्क साधावा असेही अधीक्षक म्हणाल्या. चिकलठाणा ठाण्याचे लहू थोटे व सरला जाधव या पोलिस दादा व दीदींचे मोबाईल क्रमांक व फोटोचे फलक शाळेत लावण्यात आले. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांची उपस्थिती होती. उज्ज्वलाताई पवार शाळेचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, सचिव प्रतिभा सूर्यवंशी, उपाध्यक्ष भूषण सूर्यवंशी, प्राचार्य सचिन पवार, उपप्राचार्य किरण बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश बच्छाव यांनी उपक्रमासाठी मदत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com