अपघात झाल्यास अभियंत्यांवर गुन्हे, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.15) आयोजित संसद सदस्य सुरक्षा समितीच्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते.

लातूर ः जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.15) आयोजित संसद सदस्य सुरक्षा समितीच्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तीनशे लोकांचे प्राण गेलेले आहेत. लोकांचे जीव अत्यंत महत्त्वाचे आहेत.

त्यामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक नियमांबाबत लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन खासदार शृंगारे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा प्रमुख रस्ते ज्या ठिकाणी खराब आहेत ते दुरुस्त करावेत. तसेच रस्त्यावरील अपघातप्रवण क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी दिशादर्शक व अपघातप्रवण क्षेत्राची माहिती देणारे फलक लावावेत. तसेच रस्त्यांची दुरुस्ती सर्व संबंधित विभागाने तत्काळ करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील चाकूर ते अहमदपूर व लातूर-येडशी ते टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण ही जास्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निर्देश दिले. त्याप्रमाणेच जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीमार्फत वाहतूक नियमांबाबत सर्व नागरिकांचे प्रबोधन करण्याचे अभियान सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ‘लायन्स’ देते विस रुपयात नवीदृष्टी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व ट्रॅव्हल्स एजन्सींना मुरूड-येडशी मार्गे पुण्याला न जाता औसा-सोलापूर या महामार्गाने पुण्याकडे प्रवास करण्याचे निर्देश द्यावेत. वरील मार्गाचा अवलंब केल्यास लातूर ते टेंभुर्णीपर्यंतच्या खराब रस्त्यामुळे पुढील काळात होणारे अपघात टाळता येतील, असे ते म्हणाले.लातूर जिल्ह्यातील रस्त्यावरील अपघाताचे अकरा ब्लॉक स्पॉट निश्‍चित करण्यात आलेले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी दिली. त्याप्रमाणेच परिवहन कार्यालयाकडून वर्षभरात पंधरा हजार वाहनांवर खटले दाखल करण्यात आलेले असून, त्यांच्याकडून दोन कोटी 18 लाखांचा दंड वसूल केल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If accident occurred then charges On Engineers Latur District