मराठवाड्याच्या रेल्वेला पुन्हा 'बायपास'! 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, यामध्ये मराठवाड्याची नेहमीप्रमाणेच उपेक्षा करण्यात आली. मराठवाड्याला काहीही न दिल्याने पुन्हा नाराजीचे सूर उमटले आहेत.

 अर्थसंकल्पातून रेल्वेला आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात मनमाड-मुदखेड रेल्वेमार्गाच्या इलेक्‍ट्रिफिकेशनची तरतूद वगळता मराठवाड्याला काहीही मिळाले नाही. मराठवाड्याला रेल्वे मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. मुळात दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर कायम अन्याय करण्याची भूमिका आहे. नांदेड विभाग होऊनही मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला चालना मिळत नाही. औरंगाबादेतून दररोज 77 रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते.

औरंगाबाद ही पर्यटननगरी आहे, जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्यांमुळे या भागात पर्यटकांची रेलचेल असते. मराठवाड्यातील मोठे सामाजिक, आर्थिक आणि व्यापारी शहर म्हणून औरंगाबादची गणना होते. नांदेड-मनमाड दुपदरीकरण, रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पीटलाइन, औरंगाबादेतील मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये वाढ, नवीन मार्गावर रेल्वे सुरू करणे, मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावा, नांदेड-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करावी, नांदेड-पुणे दररोज रेल्वे गाडी सुरू करावी या मागण्या आहेत. त्याचप्रमाणे मराठवाड्याला पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गाची घोषणा यासह अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
 

रेल्वेची उपेक्षाच 
ओमप्रकाश वर्मा (अध्यक्ष मराठवाडा रेल्वे विकास समिती) : केंद्रीय अर्थसंकल्पामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पावर परिणाम झाला आहे. रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, नेमकी कशी व किती तरतूद केली, याबद्दल काहीही स्पष्टता नाही. मराठवाड्याच्या रेल्वेला काहीही नाही. मनमाड-मुदखेडच्या इलेक्‍ट्रिफिकेशनची घोषणा जुनीच आहे. नवीन राज्यराणी एक्‍स्प्रेस औरंगाबादपर्यंत करावी ही साधी मागणीही पूर्ण होत नाही. परभणी-मनमाड दुपदरीकरणाची कालमर्यादा निश्‍चित नाही. 
 

मराठवाडा उपेक्षित 
अनंत बोरकर (अध्यक्ष मराठवाडा रेल्वे कृती समिती) : रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटींची भरीव तरतूद आहे. यात मनमाड ते मुदखेड इलेक्‍ट्रिफिकेशनसाठी बऱ्यापैकी तरतूद करण्यात आली. तसेच सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गाची तरतूद वगळता मराठवाड्यातील महत्त्वाच्या औरंगाबाद ते चाळीसगाव, रोटेगाव ते कोपेरगाव या नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची खंत आहे. 
 

निराशाजनक अर्थसंकल्प 
संतोष सोमानी (अध्यक्ष, भारतीय रेल्वे प्रवासी सेना) : अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा होत्या. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ भाजपातील खासदारांच्या मागण्यांवर सरकारने विचार केला. विरोधी व मित्रपक्षाच्या खासदारांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. रेल्वच्या मराठवाड्यातील जनतेची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com