छावणीत नगरसेवकशाही!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनापरवाना रुग्णालयांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने छावणी परिषदेतर्फे सोमवारी (ता. २०) अशी रुग्णालये ‘सील’ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, नगरसेवकांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. पथकाला अक्षरश: अपमानास्पद पद्धतीने हुसकावून लावले. विशेष म्हणजे, पोलिसांकडे मागणी करूनही संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे छावणी परिषदेला कारवाई अर्धवट गुंडाळावी लागली.  

छावणी परिसरात नगरसेवकांच्या ‘आशीर्वादा’ने जवळपास बारा रुग्णालये विनापरवाना सुरू आहेत. नोंदणी न करताच रुग्णालये सुरू असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून छावणी परिषदेचा मोठा महसूल बुडत आहे. याप्रकरणी वसीम अली यांनी उपोषण केले होते. तर मराठवाडा विक्रांद संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार छावणी परिषदेच्या तीन बैठकांमध्ये यावर चर्चा झाली. कारवाईचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. सोमवारी (ता. वीस) सकाळी डॉ. गीता मालू, कार्यालयीन अधीक्षक वैशाली केणेकर, संतोष बन्सिले, विलास कुदळ, नंदू देवरे यांच्या पथकाने विनापरवाना रुग्णालयांना सील करण्याची कारवाई सुरू केली होती. पथकाने डॉ. सय्यद मोहेत्तेसीम अहेमद यांचे ‘हयात’ हॉस्पिटल आणि डॉ. प्रीती दोशी यांचे ‘दोशी’ क्‍लिनिक ‘सील’ केले. त्यानंतर हे पथक अन्य रुग्णालयांच्या दिशेने निघताच, एका ज्येष्ठ नगरसेवकासह अन्य नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. अर्वाच्य शब्दांत पथकाला अक्षरश: हुसकावण्यात आले. 

पोलिसांनी दिला नाही बंदोबस्त
नगरसेवकांनी हुसकावून लावल्यावर हे पथक छावणी पोलिस ठाण्यात आले. त्या ठिकाणीही पोलिसांसमोरच पथकाला अपशब्द वापरण्यात आले. पथकाने बंदोबस्त देण्याची लेखी मागणी केली. मात्र, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी नकार दिला. त्यांची तक्रारही घेतली नाही. पोलिस आयुक्तांना विचारून नंतरच बंदोबस्त देण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे पथकाला कारवाई अर्ध्यावर गुंडाळावी लागली. 

Web Title: Illegal Hospital Issue Crime