अवैधरित्या वाळू उत्खनन सुरुच !

file photo
file photo


मानवत (जि.परभणी) : तालुक्यातील वाळु घाटावरून सध्या अवैध वाळू उपसा सुरु आहे. तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना रात्री चोरटी वाहतूक केली जात आहे. दुसऱ्या बाजूला मागणी वाढल्याने वाळूच्या दरात मोठी वाढ झाली. वाळुमाफियांना रोखण्याचे महसूल प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील कुंभारी येथील घाटावरून वाळू उत्खनन करणारे एक वाहन गुरुवारी (ता.१६) रात्री तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.

मानवत तालुक्यात एकूण बारा वाळु घाट असून यापैकी हटकरवाडी, रामपुरी, कुंभारी, वांगी व थार हे महत्वाचे वाळु घाट गोदावरी पात्रात आहेत. नरळद, इरळद, सांवगी मगर, गोगलगाव, पार्डी, शेवडी जहांगीर व टाकळी निलवर्ण हे वाळु घाट दुधना पात्रात आहेत. यापैकी एकाही वाळु घाटाचा लिलाव झालेल्या नसून निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरवातीस ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने वाळु टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी वाळूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाच ब्रास वाळुसाठी तब्बल पस्तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. या संधीचा फायदा घेऊन वाळुमाफिया सक्रिय झाले असून रात्रीच्या वेळेला बहुतांश घाटावरून वाळू उत्खनन केले जात आहे. 

हेही वाचा - ‘तान्हाजी’ चित्रपटात परभणीचा तरूण ​

पथके स्थापन करून कारवाई
या विरोधात महसूल प्रशासनाने पथके स्थापन करून कारवाई सुरु आहे. महिन्यापूर्वी कुंभारी येथे अवैध वाळु वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर आढळून आली होती. परंतू, संबंधित वाहनचालक ट्रली सोडून पसार झाले होते. यानंतर चार दिवसापूर्वी टाकळी नीलवर्ण येथे पथकाला अवैध उत्खनन करणारे ट्रॅक्टर आढळून आले होते.
 पथकाचा सुगावा लागल्यानंतर ट्रॅक्टरचालक वाहनासह फरार झाला होता. गुरुवारी( ता.१६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पथकाने कुंभारी घाटात वाळू उत्खनन करीत असताना एक ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. तहसीलदार डी. डी. फुफाटे, मंडळ अधिकारी पी. व्ही. सुरवसे, नांदापूरकर, तलाठी कोल्हे आदींनी ही कारवाई केली. यानंतर सदरील वाहन मानवत पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. तालुक्यासह शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. तसेच घरकुल योजनेत प्रस्ताव मजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून वाळुची मागणी वाढली आहे. मागील दहा महिन्यापासून कोणत्याही घाटाचा लिलाव झालेल्या  नसताना चोरट्या मार्गाने वाळु उपलब्ध होत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले नसताना वाळु उपलब्ध कशी होते या प्रश्न उभा राहतो. सध्या तरी महसूल प्रशासनासमोर वाळु माफियांनी आव्हान उभे केले आहे.

दंड वाचविण्यासाठी पळविले वाहनांचे हेड
महिन्याभरापूर्वी महसूल प्रशासनला कुंभारी येथे दोन ट्रॅक्टर उत्खनन करताना आढळले होते. परंतू, संबंधित चालक ट्रॅक्टर हेड घेऊन फरार झाले होते. पथकाच्या हाती दोन विनाक्रमांक ट्रॉली लागल्या होत्या. सध्या या दोन्ही ट्रॉली पोलिस स्टेशनला जमा करण्यात आलेल्या आहेत. दंड वाचविण्यासाठी चालकाने ही शक्कल लढवली. दंड रक्कमेपेक्षा ट्रॉलीची किंमत कमी असल्या कारणाने वाहन चालकांने हेड पळवले. आत्ता महसूल प्रशासनासमोर संबंधित वाहनमालकांचा शोध कसा घ्यावा हा प्रश्न उभा राहिला आहे.

दंडात्मक कारवाई करेल
वाळु माफिया विरोधात प्रशासनाने वेळोवेळी सक्त कारवाई केली आहे. प्रशासन यानंतरही आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करेल.
- डी. डी. फुफाटे , तहसीलदार,मानवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com