मुख्य जलवाहिनीवरील पाणीचोरी पकडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद - शहरात सुमारे सव्वा लाख अनधिकृत नळ असल्याचे आकडे महापालिका प्रशासनाने वारंवार सादर केले; मात्र अभय योजनेच्या नावाखाली पाणी चोरणाऱ्यांना अभय दिले गेले. असे असतानाच आता गुरुवारपासून (ता. दहा) मुख्य जलवाहिनी फोडून पाणी चोरणाऱ्यांवर मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली. मोतीकारंजा परिसरात जेसीबीने रस्ता खोदून सायंकाळपर्यंत २० नळजोडण्या तोडण्यात आल्या. 

औरंगाबाद - शहरात सुमारे सव्वा लाख अनधिकृत नळ असल्याचे आकडे महापालिका प्रशासनाने वारंवार सादर केले; मात्र अभय योजनेच्या नावाखाली पाणी चोरणाऱ्यांना अभय दिले गेले. असे असतानाच आता गुरुवारपासून (ता. दहा) मुख्य जलवाहिनी फोडून पाणी चोरणाऱ्यांवर मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली. मोतीकारंजा परिसरात जेसीबीने रस्ता खोदून सायंकाळपर्यंत २० नळजोडण्या तोडण्यात आल्या. 

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाच-सहा दिवसांनंतरही नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शनिवारी (ता. पाच) झालेल्या सर्वसाधारण सभेत पाण्याचा प्रश्‍न चांगलाच पेटला होता. यावेळी अनधिकृत नळ तोडण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. त्यानंतर महापौरांनी सोमवारपासून (ता. सात) शहरात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी कारवाई झाली नाही; मात्र गुरुवारी मोतीकारंजा भागात सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आली. या भागात क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवरून शहागंजकडे जाणाऱ्या ५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य पाइपलाइनवर अनेकांनी नळ घेतले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्ता खोदून पाइपलाइन मोकळी केली व अनधिकृत नळ जोडणाऱ्यांचा शोध घेतला. सायंकाळपर्यंत वीस नळ कर्मचाऱ्यांनी बंद केले. दिवसभरात ही मोहीम सुरूच होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, सिटी चौक पोलिस स्टेशनचे हेमंत कदम हे सज्ज होते. दरम्यान, अनधिकृत नळ कनेक्‍शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

थेट पंतप्रधानांकडे तक्रार 
या पाइपलाइनवरील अनधिकृत नळ कनेक्‍शनची थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनानेदेखील कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

पाणीपुरवठा विभाग ‘स्विच ऑफ’ 
कारवाईनंतर पाणीपुरवठा विभाग ‘स्विच ऑफ’ झाला. एकाही अधिकाऱ्याचा रात्री उशिरापर्यंत फोन लागत नव्हता. 

दोन दिवसांआड पाणी का नाही? 
संपूर्ण शहरात दोन दिवसांआडच पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका पुन्हा एकदा महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली असून, तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक का केले? याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल. नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करू, असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. प्रभारी आयुक्तांना अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोपही महापौरांनी केला. महापालिकेत प्रशासन चालविणाऱ्या महापौरांनीच पाण्याचा प्रश्‍न म्हणजे प्रशासनाचे अपयश असल्याचा दावा केला. दोन दिवसांआड पाणी देण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाब विचारू, असे महापौर म्हणाले. 

Web Title: illegal water connection break crime