तोडलेला नळ रात्रीतून घेतला जोडून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

मोतीकारंजा येथील एका धार्मिक स्थळाचे कनेक्‍शनही तोडण्यात आले होते; मात्र महापालिकेच्या कारवाईनंतर रात्रीतून पुन्हा कनेक्‍शन घेण्यात आल्याचे गुरुवारी (ता. २७) समोर आले.

औरंगाबाद - मुख्य लाइनवरून घेतलेले नळ तोडण्याची मोहीम महापालिकेने बुधवारी (ता. २७) राबविली. त्यात मोतीकारंजा येथील एका धार्मिक स्थळाचे कनेक्‍शनही तोडण्यात आले होते; मात्र महापालिकेच्या कारवाईनंतर रात्रीतून पुन्हा कनेक्‍शन घेण्यात आल्याचे गुरुवारी (ता. २७) समोर आले. त्या ठिकाणी नळाचे पाणी टॅंकरमध्ये भरताना महापालिकेच्या पथकाने पकडले. उपायुक्त मंजूषा मुथा यांनी ही कारवाई केली.

महापालिकेच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी मोतीकारंजा येथे मुख्य पाइपवरून घेण्यात आलेले नळ तोडण्याची कारवाई केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आल्याने त्याची दखल घेत ही मोहीम सुरू करण्यात आली; मात्र त्यावरून एवढा तणाव वाढला की, पुढे दंगलीला हेच कारण कारणीभूत ठरले. त्यानंतर महापालिकेने बेकायदा नळ तोडण्याची मोहीम थांबवली. दरम्यान, बुधवारपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. मोतीकारंजा येथे दीड इंचाचे नळ कनेक्‍शन तोडण्यात आले. महापालिकेचे पथक माघारी फिरताच हे कनेक्‍शन रात्रीतून पुन्हा जोडण्यात आले. याबाबत माहिती मिळताच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सकाळी पथकाला कारवाईसाठी पाठवले. पथकाने पाहणी केली असता बेकायदा नळाद्वारे टॅंकर भरण्यात येत असल्याचे आढळून आले. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने तणाव निर्माण झाला. शेवटी प्रचंड पोलिस बंदोबस्तात पुन्हा नळ कनेक्‍शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. पथकप्रमुख मंजूषा मुथा यांनी धार्मिक स्थळामध्ये जाऊन कारवाईला विरोध न करण्याचे आवाहन करीत नळ कनेक्‍शन बंद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal water connection joint at night