शिवसेना नगरसेवकानेच दिले बेकायदा नळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्‍नाचा भडका उडालेला असताना आता नगरसेवक व प्रशासनामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शनिवारी (ता. पाच) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी शिवसेनेचे नगरसेवक आत्माराम पवार यांनीच त्यांच्या वॉर्डात बेकायदा नळ दिले आहेत, आपल्याकडे तक्रारी व पुरावे असल्याचा खळबळजनक खुलासा केला. 

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. पेटलेल्या पाण्याचे पडसाद शनिवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले. पाण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना आत्माराम पवार यांनी माझ्या वॉर्डांत पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जनतेला आता हे सहन करणे शक्‍य नाही, असा इशारा दिला. त्यावर कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी तुमच्या वॉर्डांत, तुम्हीच बेकायदा नळ दिले आहेत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे, असा आरोप केला. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही चहल यांनी केल्याने श्री. पवार यांचे पाणी पाणी झाले. महापौरांनीदेखील वादाचे विषय नको, असे सांगत बगल दिली.

माजी नगरसेवकाला मोफत टॅंकर
भाजप नगरसेवक गोकुळ मलके यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष दहीहंडे यांच्यावर आरोप केला. गेल्या आठ वर्षांपासून ते टॅंकरने मोफत पाणी घेत आहेत, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावेत, अशी मागणी मलके यांनी केली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मला या विषयाची माहिती द्यावी, असे म्हणत महापौरांनी हा विषयदेखील थांबविला.

बोअरच्या पाण्यावरून नगरसेवकांत वाद 
सलीम अली सरोवरातील बोअरच्या पाण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमधील वाद समोर आला. मोहन मेघावाले यांनी या बोअरचे टॅंकरला मोफत पाणी दिले जात असून, त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी केली. त्यावर चहल यांनी सीताराम सुरे व प्रदीप काळे यांना पाणी देण्यात येत आहे. त्यांनी टॅंकरसाठी पैसे भरले असल्याचा दावा केला.

Web Title: illegal water connection shivsena corporator