आयएमएच्या डॉक्‍टरांचा आज बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

 कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज येथे डॉक्‍टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१७) देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

औरंगाबाद - कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज येथे डॉक्‍टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१७) देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व दवाखाने सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी (ता. १८) सकाळी सहापर्यंत बंद राहतील. दरम्यान, आपत्कालीन सेवा देण्यात येईल, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी यांनी रविवारी (ता. १६) दिली. 

शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) शाखेचे सर्व सभासद आयएमए हॉल येथे सोमवारी सकाळी नऊ वाजता एकत्र येऊन निषेध नोंदवणार असल्याची माहिती सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी दिली. बंददरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले. आयएमएचे सर्व १,४०० सभासद या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सहसचिव डॉ. हरमितसिंग बिंद्रा यांनी सांगितले. केंद्र शासनाने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्यरक्षकांचे संरक्षण करावे, अशी आयएमएची मागणी असल्याचे सचिव डॉ. गाडे यांनी सांगितले.

घाटी रुग्णालयाची यंत्रणा सज्ज 
आयएमएच्या बंददरम्यान, गरज भासल्यास रुग्णालयाचे रुटीन कामकाज बाजूला ठेवून आपत्कालीन सेवा प्राधान्याने देण्यात येतील. त्यासाठी घाटी रुग्णालयाची यंत्रणा सज्ज असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMA doctor band