पाच दिवसांच्या टेंबे गणपतीचे विसर्जन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

माजलगावात मानाचे टेंबे ठरले विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण 
 

माजलगाव (जि. बीड) -119 वर्षांची आगळीवेगळी परंपरा असलेल्या व पाच दिवसांचा गणपती असलेल्या टेंबे गणपतीला शनिवारी (ता. 14) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील श्रीराम मंदिरामध्ये टेंबे गणपतीची स्थापना सोमवारी (ता. नऊ) करण्यात आली होती. या गणपतीला आगळीवेगळी परंपरा लाभलेली आहे.

मागील 119 वर्षांपासून इकोफ्रेंडली गणपती स्थापना हे मंडळ करत आहे. स्थापनेपासून पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाचही दिवस भाविकांनी नवसपूर्तीसाठी मोदक, अनारसे व श्रीफळाच्या माळा श्रींचरणी अर्पण केल्या. आज श्रीराम मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात मठगल्लीमार्गे हनुमान चौकात मिरवणूक आणण्यात आली. येथून ही मिरवणूक झेंडा चौकमार्गे पाटील गल्लीत नेण्यात आली. ठिकठिकाणी श्रींची आरती गणेशभक्तांनी केली.

चौका-चौकांत आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे टेंबे घेऊन भक्तगण सहभागी झाले. गणेश मंडळाने श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवतांडव, मिशन मंगळयान हे सजीव देखावे सादर केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व नाश्‍त्याची सोय करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion of five-day Tembe Ganapati