आयात उमेदवारांवर भाजपची मदार

हरी तुगावकर
शनिवार, 8 एप्रिल 2017

जुन्या भिडूंना संधी देत कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई

जुन्या भिडूंना संधी देत कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई
लातूर - महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक नाही, तर कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख व भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई झाली आहे. त्यामुळे उमेदवारी निवडीत पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीला महत्त्व दिल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवारांवरच भारतीय जनता पक्षाची मदार आहे. तर अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देत कॉंग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे.

महापालिकेवर गेली अनेक वर्षे कॉंग्रेसची सत्ता आहे. मावळत्या महापालिकेत कॉंग्रेसचे 50 नगरसेवक आहेत. या महापालिकेत भाजपचा एकही नगरसेवक नाही. तरीदेखील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीत कॉंग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेतीलच सैन्य घेऊन त्यांनी कॉंग्रेसचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. पक्षाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उमेदवार हे आयात केलेले दिसून येत आहेत. त्यात कॉंग्रेसचे सुरेश पवार, शफी सय्यद, विद्यासागर शेरखाने, राजकुमार आकनगिरे, अजय कोकाटे, शिवसेनेचे रवी सुडे, धनराज साठे, गोरोबा गाडेकर यांच्या पत्नी श्रीमती गाडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शैलेश स्वामी, अर्चना आल्टे, संगीत रंदाळे अशा अनेकांचा समावेश आहे. पक्षात प्रवेश देऊन त्यांना पालकमंत्री निलंगेकर यांनी उमेदवारीही दिली आहे. देवीदास काळे व ऍड. शैलेश गोजमगुंडे ही दोन नावे सोडली तर इतर पक्षनिष्ठेने काम करणाऱ्यांना मात्र उमेदवारीत डावलण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जुन्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान श्री. निलंगेकर यांच्यासमोर आहे.

कॉंग्रेसलादेखील जुन्या-नव्यांच्या वादाला सामोरे जावे लागत आहे. माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनी विद्यमान महापालिकेतील सुमारे पन्नास टक्के जुन्यांना संधी देऊन अस्तित्वाची लढाई जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात महापौर ऍड. दीपक सूळ, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्रांत गोजमगुंडे, रमेश बिसेन, कैलास कांबळे, पूजा पंचाक्षरी, किशोर राजुरे, सपना किसवे, शशिकला यादव, योजना कामेगावकर, पप्पू देशमुख, पंडित कावळे, रविशंकर जाधव, राजकुमार जाधव, लक्ष्मण कांबळे, अनुप मलवाडे, स्मिता खानापुरे, गिरीश पाटील, अंजली चिंताले, असगर पटेल यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर व नगरसेविका रेहाना बासले,

तसेच रिपाइंतून आलेल्या दीप्ती खंडागळे यांना श्री. देशमुख यांनी उमेदवारी दिली. अनेक ठिकाणी जुन्याच नगरसेवकांना संधी दिल्याने इच्छुकांच्या नाराजीला कॉंग्रेसला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या इच्छुकांची मने वळविण्यात श्री. देशमुखांची कसोटी लागणार आहे.

पक्षात नसताना उमेदवारी
कॉंग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे पुत्र अजित पाटील कव्हेकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही, अशी माहिती खुद्द पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. तरीदेखील त्यांना प्रभाग 18 मधून भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे माजी आमदार कव्हेकर हेही येत्या काळात भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

निवडणुकीतून 333 जणांची माघार
महापालिकेच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 333 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे 70 जागांसाठी आता 401 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांकडून उमेदवारी भरताना जोशात असलेल्या अनेकांनी नाराजीने अर्ज माघारी घेतले; तसेच काहींनी पक्षाचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष राहणे पसंत केले. भाजपसह बहुतांश पक्षांत बंडखोरी झाल्याने अधिकृत उमेदवार अजूनही तडजोडीत मग्न आहेत.

Web Title: Import candidates on party ranks