'हे' गॉगलवाले खासदार आत्ता शेतकऱ्यांच्या भेटीला

जगदीश पानसरे
Monday, 11 November 2019

आमचे खासदार हरवले आहेत, असे निवदेन एका तरूणाने दिल्यानंतर आणि चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर इम्तियाज यांना अखेर जाग आली. आज त्यांनी कन्नड तालुक्‍यातील काही गावांना भेटी देऊन तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

औरंगाबादः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नुकत्याच निवडून आलेल्या आमदारांनी सत्कार, समारंभ बाजूला सारत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तात्काळ पंचनामे आणि नुकसान भरपाईची मागणी लावून धरली. पण जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांना मात्र याचा गंधही नव्हता. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

आमचे खासदार हरवले आहेत, असे निवदेन एका तरूणाने दिल्यानंतर आणि चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर इम्तियाज यांना अखेर जाग आली. आज त्यांनी कन्नड तालुक्‍यातील काही गावांना भेटी देऊन तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावरून आता खासदारांवर वरातीमागून घोडे अशी टिका होत आहे. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

राज्यासह जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना कोंब फुटले. मका, कापूस, सोयाबीन या पिकांच्या गंजी अक्षरशः पाण्यात बुडाल्या. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला. मात्र राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम, मतमोजणी सुरू असल्याने अख्खे प्रशासन त्यात गुंतले आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. पण निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या आमदारांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

अब्दुल सत्तार यांनी काढला पहिला मोर्चा

हात-तुरे, सत्कार, समारंभाला फाटा देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत पंचनामे करण्याची मागणी लावून धरली. शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा या मागणीसाठी राज्यातला पहिला मोर्चादेखील काढला. पण या सगळ्या संकटात जिल्ह्याचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील मात्र कुठेच दिसले नाही. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

इम्तियाज यांना शेतकऱ्यांचा विसर पडला

एरवी प्रत्येक घडामोडीवर प्रतिक्रिया देणारे खासदार अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन तीन आठवडे उलटले तरी कुठेच दिसले नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाचे आत्मचिंतन करण्यात ते दंग होते असे बोलले जाते. पण जिल्ह्याचे खासदार या नात्याने त्यांनी सर्वात आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित होते. मात्र याचा इम्तियाज यांना विसर पडला आणि यातून उद्विग्न झालेल्या एका तरूणाने चक्क आमचे खासदार हरवले आहेत, त्यांना शेतकरी आणि त्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा प्रकारचे निवदेन प्रसिध्दीस दिले. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

बेफिकरी वृत्तीबद्दल नाराजीचे सूर

सर्वसामान्य नागरिकांमधून देखील खासदार इम्तियाज जलील यांच्या या बेफिकरी वृत्तीबद्दल नाराजीचे सूर उमटायला सुरूवात झाली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या इम्तियाज जलील यांनी अखेर आज कन्नड तालुक्‍यातील चिंचखेडी, शिरोळी, कविटखेडा गावात जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

Imtiyaz Jaleel Aurangabad

सरकारकडे पाठपुरावा करू

शेतकऱ्यांना नुकसना भरपाई मिळवून देण्यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्‍वासन देखील त्यांनी यावेळी दिले. इम्तियाज जलील यांच्या या पाहणी दौऱ्यानंतर आता त्यांच्या विरोधात शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये असलेला रोष कमी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा - सडलेलं पीक बघून काळीज पिळवटून जातंय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel visited Farmers to see crop loss