फीत कापण्याचा हक्कदार मीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांना अन्य गटनेत्यांप्रमाणे स्वतंत्र दालन देण्यावरून थोडीशी ओढाताण झाल्यानंतर उपायुक्‍त दालनाशेजारी दालन मिळाले. या दालनाच्या उद्‌घाटन प्रसंगी महापौरांचा मान, आमदार आणि शहराध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्याने कोणाच्या हाताने फीत कापावी, असा प्रश्‍न निर्माण झाला. अखेर शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी फीत कापली आणि महापौर भगवान घडामोडे व आमदार अतुल सावे यांनी हात लावला.

भाजपचे गटनेते म्हणून विद्यमान महापौर भगवान घडमोडे यांची निवड करण्यात आली होती. स्थायी समितीच्या निवृत्त सदस्यांसह पाच विषय समिती सदस्यांची नावे गटनेत्यांमार्फत पीठासीन अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रथा आहे. मात्र, पीठासीन अधिकारी म्हणून विद्यमान महापौर श्री. घडमोडे असल्याने गटनेता म्हणून ते नावे कशी देणार असा पेच निर्माण झाला. त्या वेळी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी गटनेतेपदी प्रमोद राठोड यांची नियुक्ती केली. यानंतर प्रशासनाने महिनाभरापासून दालन साफ करून उपलब्ध करून दिले नसल्याचे सांगितले जात असले तरी यामागे स्वकीयांकडूनच अडवणूक झाल्याची चर्चा महापालिकेत होती. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) या दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यात फीत कापण्यावरून चांगलीच पतंगबाजी झाली. गटनेते आपल्या मतदारसंघातील असून, त्यांच्या दालनाच्या उद्‌घाटनाचा हक्कदार आपणच असल्याचे श्री. सावे म्हणताच, मी शहराचा अध्यक्ष असल्याने खरा हक्कदार मीच असल्याचे श्री. तनवाणी म्हणाले. अशा हलक्‍याफुलक्‍या वातावरणात आपली अधिकारवाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी नवनियुक्त गटनेता प्रमोद राठोड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले, ज्ञानोबा मुंडे, हेमंत खेडकर, बालाजी मुंढे, कचरू घोडके, माजी उपमहापौर संजय जोशी, अनिल मकरिये आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Inauguration of BJP group leader