आयटीचे छापासत्र सुरूच, दोन कोटींचा प्राप्तिकर वसूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

औरंगाबाद - करचुकवेगिरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने करडी नजर टाकली असून चार छाप्यांत शहरातील चार मोठ्या आस्थापनांकडून जवळपास दोन कोटींचा कर "पंतप्रधान गरीब कल्याण योजने'त आणला आहे. यामध्ये शहरातील एक नामांकित "लिकर लीडर' तर दुसरा एका कोचिंग क्‍लासेस संचालकाचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहरात एकूण सात छापे टाकण्यात आले असून 12 हजारांहून अधिक बॅंक खात्यांची रीतसर चौकशी सुरू आहे.

नोटाबंदीच्या काळात ज्या खात्यांमध्ये संशयित व्यवहार झाले त्यांची माहिती प्राप्तिकर विभागाने गोळा केली आहे. यावरून 12 हजारांहून अधिक खाती गोठविण्यात आली होती. औरंगाबाद प्राप्तिकर विभाग रेंज एकमध्ये मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जालना आणि रेंज दोनमध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. प्राप्तिकरच्या रेंजमध्ये औरंगाबाद शहराचे दोन भाग येत असून जालना रोडच्या उत्तरेस एक आणि दक्षिणेस दुसरा भाग येतो. औरंगाबादेत जालना रोडच्या दक्षिणेकडील सर्व भाग हा निवासी भाग म्हणून गणला जात असला तरी येथेही यंदा दहा टक्के वसुली वाढली आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी (ता. चार) जोरदार करवसुली मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे.

धारूरला बंद पाळून निषेध
बीड जिल्ह्यातील धारूर येथे काही ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे मारले. यात विविध हिशेब, कागदपत्रांची छाननी करण्यात आली. याचा निषेध म्हणून सर्व ज्वेलर्सनी गुरुवारी आपली दुकाने बंद ठेवली. चार ते पाच ज्वेलर्सची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.

लातूरमध्येही वसुली
लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि उदगीर या तीन ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या रेंज तीन प्रदेशात गेल्या दोन-चार दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. या छाप्यातून एक कोटीची वसुली करण्यात आली. अनेक बॅंक खातीही गोठविण्यात आली असून तीन परिसरातून 50 लाखांहून अधिक निधी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत टाकून सर्व कर भरणा करण्यात आला आहे.

Web Title: income tax raid