‘सीबीएसई’च्या चार शाळांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

दहा ते बारा शाळा रडारवर
या छाप्यानंतर आणखी सीबीएसई माध्यमांच्या शाळांवर कारवाईची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. शहरातील दहा ते बारा सीबीएसईच्या शाळा प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद - शहरातील केंद्रीय माध्यमिक शालांत मंडळाच्या (सीबीएसई)च्या चार शाळा व त्यांच्या कार्यालयांवर बुधवारी (ता.१०) प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. कोट्यवधींचे उत्पन्न असूनही, या शाळा करचुकवेगिरी करीत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

प्राप्तिकर विभागाचे ३० अधिकारी, पोलिसांचा फौजफाटासह एकाच वेळी ही कारवाई केली. यात जालना रोडवरील ऑयस्टर इंग्लिश स्कूल, पीएसबीए इंग्लिश स्कूल हिरापूर शिवार चिकलठाणा, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल वाळूज, रॉयल ओक्‍स वर्ल्ड स्कूल देवळाई या शाळांचा समावेश आहे. प्रत्येक शाळेचा वर्षाचा निव्वळ नफा हा चार ते पाच कोटी रुपये आहे. तरी देखील या संस्थांनी प्राप्तिकर विवरण पत्रदेखील भरले नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात अशा संस्थांना मार्गदर्शनासाठी प्राप्तिकर विभागाकडून जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तरी देखील अनेक संस्थांनी साधे प्राप्तिकर विवरणपत्रही भरले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अपर प्राप्तिकर आयुक्त संदीपकुमार सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांना विचारले असता, केलेली कारवाई ही गोपनीय असून त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax Raid on eistar english school Crime