कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ, निराधारांचे  अनुदान "जैसे थे'च का? 

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : महागाई वाढली की सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळतो. मात्र, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 26 ऑक्‍टोबर 2010 पासून म्हणजे नऊ वर्षांपासून अनुदानात वाढ मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांचे महागाईनुसार भत्ते वाढविता, मग आमचे अनुदान जैसे थेच का, असा सवाल आता सहाशे रुपयांमध्ये कसेबसे घर चालविणारे निराधार विचारत आहेत. 

निराधार वृद्ध, अंध, दिव्यांग, शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार विधवांना आर्थिक आधार देत सन्मानाने जगता यावे, म्हणून संजय गांधी निराधार योजना सुरू केलेली आहे. भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तर आर्थिकदृष्टया निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने श्रावणबाळ सेवा योजना सुरू केलेल्या आहेत. या लाभार्थ्यांना 25 ऑक्‍टोंबर 2010 पर्यंत पाचशे रुपये दिले जात. 26 ऑक्‍टोंबर 2010 पासून त्यात शंभर रुपये वाढ झाली. यात गुजराण शक्‍य नाही. राज्यात नवीन सरकार आल्यावर या अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मध्यंतरी लाभार्थी निवड समित्यांचे काम ठप्प पडल्याने लाभार्थ्यांना अनुदानाच मिळाले नसल्याच्या तक्रारीही केल्या गेल्या. 

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना राबवली जाते. तहसील कार्यालयामार्फत त्याची अंमलबजावणी होते. यात विधवा, निराधार महिला, दुर्धर आजारी व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, परितक्‍त्या, घटस्फोट प्रक्रियेतील महिलांना दरमहा आर्थिक अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेत दारिद्रयरेषेखालील वृद्धांना, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत भूमिहीन शेतमजूर व कमकुवत घटकातील महिला व विधवांना योजनेचा लाभ दिला जातो. 

मी शंभर टक्‍के अंध आहे. मला दरमहिना एक हजार रुपये मिळतात. मात्र, या महागाईच्या युगात काहीही होत नाही. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यासोबतच गरीबांसाठी सुरु केलेल्या योजनांच्या अनुदानातही वाढ व्हायला हवी. 
-बाबुलाल संकपाळ, (लाभार्थी, संजय गांधी योजना) 

शंभर टक्‍के अंध, दिव्यांग असलेल्यांना केवळ हजार रुपये 
ज्यांना 40 ते 79 टक्‍के दिव्यांग (अंपगत्व) आहे अशांना आठशे तर 82 ते 100 टक्‍के अंपगत्व असलेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये अनुदान दिले जाते. पूर्ण अंध असलेली व्यक्‍ती काहीच काम करू शकत नाही, मग मिळणाऱ्या या अनुदानात घर कसे चालवायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com