राष्ट्रवादीच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईचे संकेत

सयाजी शेळके
सोमवार, 13 जानेवारी 2020

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 17 सदस्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 17 सदस्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे. या सर्वच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण 26 सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, नवीन गटनेते दत्तात्रय देवळकर यांच्या आदेशानुसार आम्ही मतदान केल्याचे जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांनी सांगितले. 

अपात्रतेच्या कारवाईचे संकेत 
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाआघाडीकडून शिवसेनेच्या अंजली शेरखाने यांना, तर उपाध्यक्षच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रकाश आष्टे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याऐवजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अस्मिता कांबळे यांना, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार धनंजय सावंत यांना मतदान केले.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पक्षादेश (व्हीप) काढला होता. त्यामुळे या 17 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी बिराजदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिवाय या सर्वच सदस्यांवर तीन महिन्यांत अपात्रतेची कारवाई पूर्ण होईल, असाही विश्‍वास त्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे आता या सदस्यांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. पक्षादेश कोणाचा? 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश बिराजदार यांनी पक्षादेश काढला. सर्वच सदस्यांना हा पक्षादेश देण्यात आला होता. तरीही 17 सदस्यांनी आदेशाच्या विरोधात मतदान केल्याचे श्री. बिराजदार सांगतात, तर आम्ही बहुमताने गटनेते बदलला असून, नूतन गटनेते देवळकर यांच्या आदेशानुसार मतदान केल्याचे मडके सांगत आहेत. त्यामुळे पक्षादेश खरा कोणाचा? जिल्हाधिकारी यावर काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊन आठही दिवस झाले नाहीत. त्यात अपात्रतेच्या कारवाईचे संकेत मिळत असल्याने सदस्यांची धाकधूक वाढली आहे. 

आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य आहोत. नवीन गटनेते दत्तात्रय देवळकर यांच्या आदेशानुसारच आम्ही मतदान केले आहे. त्यामुळे अपात्रतेचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आतापर्यंत तरी आम्हाला यासंदर्भात कोणाची नोटीस मिळालेली नाही. 
- संदीप मडके, जिल्हा परिषद सदस्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indications for action against rebel members