उद्योजकासह पत्नी, नातवावर घरात घुसून कोयत्याने वार 

उद्योजकाचे घर
उद्योजकाचे घर

औरंगाबाद - रघुवीरनगर येथील उद्योजक कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराने चोरीसाठी नव्हे; तर अंतर्गत वादातून हल्ला केल्याचे समोर येत आहे. उद्योजकाच्या बंगल्यात असलेले दहा सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान, अन्य ठिकाणच्या सीसीटीव्हीत जॅकेट परिधान केलेला हल्लेखोर पळताना कैद झाला आहे. हल्लेखोर निष्पन्न झाला असून, त्याला ताब्यात घेण्याची शक्‍यता वाढली आहे.

रघुवीरनगर येथील उद्योजक पारस छाजेड (वय 72), त्यांच्या पत्नी शशिकला (वय 65), नातू पार्थ (वय 17) यांच्यावर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बंगल्यात कोयत्याने हल्ला झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाळीस वर्षांपासून श्री. छाजेड यांची चिकलठाणा एमआयडीसीत वीजपंपाची कंपनी आहे. तेच कंपनीचा कारभार पाहतात. त्यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मुलगा आशिष ऐन हल्ल्यावेळी बाहेर होता. त्यामुळे जवळच्या व ओळखीतील व्यक्तींवर पोलिसांना संशय आहे. हल्ला आर्थिक, व्यावसायिक वादातून घडल्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 
  
कोण काय म्हणाले... 
 

आजीनाथ बडक (शेजारी) - मी कंपनीतून आलो. नंतर जेवण करून झोपी गेलो. हल्लेखोर हल्ला करून गेल्यानंतर आरडाओरड समजल्यानंतर मी बाहेर आलो. त्यावेळी कुटुंबातील भाभी वरच्या मजल्यावर गॅलरीत होत्या. त्यांना घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून शिडी आणून खाली उतरवले. आधी काय घडले, याची कल्पनाच नाही. 
  
आशिष छाजेड - आमचा कुणासोबतच वाद नव्हता. कोणीही आमच्यावर नाराज नाहीत. कुणासोबत शत्रुत्व नव्हते. 
 

विधी छाजेड - हल्ला झाल्यानंतर मी घडलेला प्रकार पतीला संपर्क साधला; पण त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्राच्या मोबाईलवरून त्यांना कळविले. 
  
पोलिस सूत्र - ज्यावेळी आशिष छाजेड घरी आले तेव्हा जखमींना रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हा एक मिनीट थांबा, मी शूटिंग घेतो, असे आशिष म्हणाल्याची बाब पोलिस सूत्रांनी दिली. 
 

घटनाक्रम 

  • बुधवारी रात्री 9 नंतर आशिष छाजेड दोन मित्रांसोबत पंचतारांकित हॉटेलात जेवणासाठी गेले. 
  • रात्री 10.37 पर्यंत मुंबईतील व्यक्तीसोबत पारस छाजेड यांचा मोबाईलवरून संवाद. 
  • रात्री 11 च्या सुमारास हल्लेखोर आला. दहा मिनिटांत हल्ला करून पसार. 
  • 11.20 वाजता पळतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त. 

 
असा झाला हल्ला... 
 

  •  आशिष घरी परतणार असल्याने सुरक्षा दरवाजा उघडा ठेवत मुख्य दरवाजा लावण्यात आला होता. 
  • हॉलमध्ये शशिकला छाजेड सोफ्यावर झोपल्या होत्या. 
  • बेल वाजताच आशिष आल्याचे समजून पारस छाजेड यांनी दरवाजा उघडला. 
  • लगेचच हल्लेखोराने कोयता पारस छाजेड यांच्या डोक्‍यात घातला. 
  • झटक्‍यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. सोफ्यावरील शशिकला यांच्या डोक्‍यातही त्याने कोयता घातला. 
  • आवाजाने बेडरूममधून पार्थ बाहेर येताच अंधारात त्याच्यावरही वार झाला. 
  • पार्थची आई विधी वरच्या मजल्यावरून पायऱ्या उतरताना त्यांना हल्लेखोर दिसताच त्या परत माघारी फिरल्या. 
  •  विधी यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून लावला. या वेळेत हल्लेखोर वरच्या मजल्यावरही आला. 
  • गॅलरीकडे धाव घेत विधी यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पसार झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com