मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे - उद्योगमंत्री सुभाष देसाई 

सुशांत सांगवे
गुरुवार, 28 जून 2018

लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करा. रणांगणात उतरा. सरकारचे डोळे खाडकन उघडा. सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांना आता खाली उतरावेच लागेल, असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

लातूर - "मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत. हे प्रश्न सोडवण्यासाठीच शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता पाहिजे", अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वबळाची हाक दिली. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करा. रणांगणात उतरा. सरकारचे डोळे खाडकन उघडा. सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांना आता खाली उतरावेच लागेल, असेही देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेचा जिल्हा मेळावा लातुरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांच्यासमोर स्वबळाचा नारा देत देसाई यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, शिल्पा सरपोतदार, अभय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

देसाई म्हणाले, "निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू असे मोदींनी सांगितले होते. आतापर्यंत 15 चिंचुकेही आले नाहीत. तेच रोजगाराचे, शेतमालाचे, दूध दराचे झाले आहे. असे असंख्य प्रश्न जनतेसमोर आहेत. ते सोडविण्यासाठी शिवसेनेला स्वबळावर सत्ता हवी आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आधीपासून झटत आहे. यापुढेही झटत राहणार आहे. म्हणून शिवसैनिकांनी जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र यावे. आंदोलने करावीत. लोकांनाही शिवसेनाच आपल्याला न्याय देईल, असे वाटू लागले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या राज्यात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही."

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Industries Minister Subhash Desai Criticized CM Devendra Fadnavis