बहरलेल्या पिकांत अळी तळ ठोकून

केदारखेडा (ता. भोकरदन) : परिसरात मका पिकातील लष्करी अळीवर औषधी फवारा मारताना शेतकरी.
केदारखेडा (ता. भोकरदन) : परिसरात मका पिकातील लष्करी अळीवर औषधी फवारा मारताना शेतकरी.

जालना - अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे बहरलेल्या पिकांवर अळीची नजर पडली आहे. परिणामी मका पिकांवर लष्करी अळीने, तर बाजरीवर हुमणी अळीचा ठिकठिकाणी प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे यंदा उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना औषधी फवारणीसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

टेंभुर्णी : पंचनाम्याची गरज 
जाफराबाद तालुक्‍यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले आहे. यामुळे मका पिकाचे हजारो हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. अळीमुळे मकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याने यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. अळीमुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. 
तालुक्‍यात नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. कधी नव्हे, यंदा मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. शेतकऱ्यांनी या लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी औषधी, कीटकनाशकाची वारंवार फवारणी करूनही ही अळी आटोक्‍यात आली नाही. मकाची कणसेही पोखरून काढीत असल्याने या पिकाचे आता करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मकाच्या प्रत्येक कणसात चार ते पाच अळ्या असल्याने या अळ्या मका पिकांचा फडशा पाडत आहेत. एवढे मोठे नुकसान होत असतानाही कृषी विभागाने ठोस अशा काही उपाययोजना हाती घेतल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
तालुक्‍यातील सर्व गावांतील मका पिकांचे तत्काळ पंचनामे कृषी विभाग व महसूल विभागाने करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच विष्णू जमधडे, गोरखनाथ राऊत, पंजाबराव सवडे, विष्णू ढवळे, अशोक राऊत, हरिभाऊ डोंगरे, संदीप सवडे, प्रल्हाद जाधव यांनी कृषी विभागाकडे केली आहे. 

केदारखेडा : बाटलीच्या स्प्रेचा वापर 
भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा, जवखेडा परिसरात मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणी यंत्रही उपयोगी ठरत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाटलीचा स्प्रे तयार करून त्याद्वारे मका पिकावर फवारणी सुरू केली आहे. यासाठी पाण्याची प्लॅस्टिकची बाटली, तीस रुपयांचा स्प्रे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केला आहे. एक एक दांड्यावर औषधी फवारणी करून अळीचा बंदोबस्त करण्यात परिसरातील शेतकरी गुंतले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकातील कणीस अळीने पोखरून टाकलेले आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन कमी मिळण्याची शक्‍यता आहे. 

कुंभार पिंपळगाव : बाजरी भुईसपाट 
कुंभार पिंपळगाव परिसरात अनेक ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील शेतकरी कल्याण कंटुले यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाचे हुमणीच्या प्रादुर्भावाने मोठे नुकसान झाले. हुमणीमुळे पूर्ण पीक भुईसपाट झाले आहे. श्री. कंटुले यांच्या शेतातील उसावर गेल्यावर्षी हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता, पूर्ण उसाचा फड जळून, करपून गेला होता. त्यानंतर त्यांनी यावर्षी ऊस मोडून या शेतात बाजरीचे पीक घेतले. पीक जोमात आले, कणसांत दाणेही भरले; मात्र पुन्हा हुमणीने डोके वर काढले आणि पूर्ण पीकच भुईसपाट केले. यामुळे तोंडाला आलेला घास हातातून निसटला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काही दिवसांतच हे पीक भुईसपाट होईल अशी भीती आहे. फवारणी यंत्रही काम करीत नसल्याने अनेकांनी बाटली व स्प्रेचा वापर करीत औषधी फवारणी करण्यास सुरवात केली आहे. स्प्रेमुळे औषधी फवारणी परिणामकारक होत आहे. 
-राजू आढाव , शेतकरी, केदारखेडा 

मका लागवडीवर अनेकांनी कर्ज काढून खर्च केला आहे. तो खर्चही या पिकाच्या उत्पादनातून वसूल होण्याची चिन्हे नाहीत. याशिवाय मकामध्ये अळी असल्याने हा चारा गुरांनाही देणे घातक आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी. 
- विष्णु जमधडे, माजी सरपंच, टेंभुर्णी 

कृषी विभागाकडून अळीमुळे मका पिकाचे होत असलेल्या नुकसानीसंदर्भात बैठकीत अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे आदेश येताच तत्काळ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान करण्यात येईल. 
- गजानन कुडके, कृषी पर्यववेक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com