हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव? लक्ष द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

turmeric

हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव? लक्ष द्या!

परभणी: सद्यःस्थितीमध्ये हळदीच्‍या शेतात मोठ्या प्रमाणात मुंगळ्याच्या आकाराच्या कंदमाशा उडताना दिसून येत आहेत. त्याकडे वेळीच लक्ष द्यावे, व्यवस्थापनासंदर्भात कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने शेतकऱ्यांना दिला आहे. कंदमाशी या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात. अशा गड्ड्यामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सूत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात. पाणी सुटून नंतर ते कुजतात. जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या किडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

कंदमाशी या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात

कंदमाशी या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात

अशा करा उपाययोजना-
ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मिलिलिटर किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही) १० मिलिलिटर प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे झाडावर फवारणी करावी. सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मिलिलिटर प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. तसेच कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य कीटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी. या शिफारसी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राने केलेल्‍या आहेत. हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात वाढताहेत रुग्ण

अशी दिसते कंदमाशी-
कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.

Web Title: Infestation Kandmashi On Turmeric Farmer Agriculture Know The Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Parbhanitur daal
go to top