एचआयव्हीच नव्हे, तर शरीर संबंधातून होतात हे दहा गंभीर आजार, जाणून घ्या...

विकास देशमुख
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

सुरक्षित शरीर संबंध गरजेचे असतात. नसता महिला आणि पुरुष दोघे या आजारांची शिकार होऊ शकतात. लग्नापूर्वी रक्ताची चाचणी जरूर करावी आणि आपले आरोग्य आपल्या हाती ठेवावे.

औरंगाबाद : एचआयव्हीचा प्रसार असुरक्षित शरीर संबंध, रक्तसंक्रमणातून होतो, हे सर्वश्रुत आहे. पण, इतर काही असे गंभीर विषाणू आहेत की ज्यांचा प्रचारही एचआयव्हीप्रमाणेच होतो. या विषाणूमुळे गंभीर आजार जडू शकतात. पण, आरोग्यविभागाकडून एचआयव्हीप्रमाणे त्यांच्याबाबत जनजागृती केली गेली नसल्याने अनेकांना त्या बाबत माहिती नाही. येत्या  १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन आहे. त्या अनुषंगाने eSakal.com च्या वाचकांसाठी अशा आजारांची खास माहिती.

गरमी (सिफिलिस) 

विकासपीडिया या संकेतस्थळवर डॉ. श्याम अष्टेकर यांनी लिहिलेल्या लेखानुसार, पोर्तूगीज खलाशांनी आपल्या देशात आजार आणला.  तो वैद्यकीय विश्वात एक धोकादायक लपाछपीचा आजार म्हणून माहीत आहे. कारण हा निरनिराळ्या स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. रोगजंतुविरोधी औषधांनी हा आजार खूप कमी झाला होता. पण, एड्सबरोबर त्याचे परत आगमन झाले आहे.

Image result for Sexually Transmitted Diseases

या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे आहे. जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात. या रोगाची पुळी पुरुषांच्या गुप्तांगावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली येते. स्त्रियांमध्ये ही पुळी योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर उठते. ही पुळी फुटून त्या जागी व्रण तयार होतो. हा व्रण 1-2 सेटी मीटर व्यासाचा, न दुखणारा, बुडाशी जाडसर व निबर असतो. वेळीच उपचार न झाल्यास यानंतर अंगावर न खाजणारे चट्टे येणे, तोंडात व्रण तयार होणे, शरीरात ठिकठिकाणी अवधाण येणे, इत्यादी त्रास सुरू होतो. गुदद्वाराच्या बाजूलाही व्रण उठतात.

ही लक्षणे प्राथमिक आजार बरा झाल्यावर 1-3महिन्यात उमटतात आणि 1-3 महिन्यांत बरी होतात. यानंतर काही महिने काहीच होत नाही. यापुढे रोग शरीरावर न दिसता आत पसरतो. काही वर्षानंतर या आजाराचे हृदय, मेंदू, हाडे यांवर दुष्परिणाम दिसतात. हाडांमध्ये या रोगाचे व्रण किंवा गाठी तयार होतात. हृदयाच्या झडपा निकामी होणे, महारोहिणीला फुगार येऊन ती कमकुवत होणे, मेंदू व चेतासंस्था निकामी होत जाणे, इत्यादी दूरगामी परिणाम होतात. यावरून सिफिलिस हा एक अत्यंत गंभीर रोग आहे हे स्पष्ट होईल. मात्र, वेळीच पुरेसा उपचार झाल्यास हा पूर्णपणे बरा होऊ शकतो व पुढचे नुकसान टळू शकते.

परमा (गोनोरिया)

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. पुरुषांमध्ये परमा असल्यास हमखास मूत्रनलिकादाह असतो. सकाळी लघवी करताना आधी एक-दोन थेंब पू येणे ही तक्रार यात सामान्यपणे दिसते. कधीकधी यापेक्षा अधिक प्रमाणात वारंवार पू येणे दिसून येते. वेळीच उपचार न झाल्यास मूत्रमार्गाचा दाह तसेच वीर्यकोश (प्रॉस्टेट ग्रंथी) व क्वचित बीजांडापर्यंत आजार पोचण्याची शक्यता असते.

क्लिक करा - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूूमरची शस्त्रक्रिया

असे झाल्यास मूत्रमार्गदाहाची किंवा जननसंस्थेच्या दाहाची लक्षणे दिसतात. 'पू' जास्त प्रमाणात येणे, मूत्रनलिकेच्या मुळाशी दुखरेपणा, इत्यादी त्रास आढळतो. स्त्रियांमध्ये परमा असल्यास मूत्रनलिकादाह आणि गर्भाशयाच्या तोंडाचा दाह होतो व त्यातून पू येतो. उपचार न झाल्यास आजार गर्भनलिकेमध्ये आणि त्यानंतर ओटीपोटात पोचण्याची शक्यता असते. गर्भनलिकांना सूज आली तर नंतर गर्भनलिका आकसून बंद होण्याची शक्यता असते. परमा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे हे महत्त्वाचे कारण आहे.

दुखरा व्रण (शांक्रॉईड)

या रोगात जननेंद्रियावर दुखणारा व्रण तयार होतो म्हणून त्याला 'दुखरा व्रण' असे म्हणतात. हा आजार जिवाणूंमुळे होतो. हा व्रण पुरुषांमध्ये जननेंद्रियाच्या टोकावर किंवा त्वचेखाली, तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडावर किंवा योनिमार्गात कोठेही  येऊ शकतो.  योग्यवेळी उपचार न झाल्यास जननेंद्रियावरची त्वचा आक्रसते व लघवीचे छिद्र बारीक होते. योग्य उपचाराने आजार पूर्ण बरा होतो.  

Image result for Sexually Transmitted Diseases

हेही आजार

व्रणविकार (ग्रॅन्युलोमा इनग्वायनेल) एलजीव्ही (मराठीत याला समर्पक शब्द नाही) हार्पिस ज्वर (हार्पिस प्रोजेनायटॅलिस), एचआयव्ही एड्स, कावीळ ब, क आणि याशिवाय खरूज, गजकर्ण, उवा हे त्वचेचे आजार पण असुरक्षित शरीर संबंधातून पसरू शकतात. तसेच स्त्री-पुरुष संबंधानंतर एक-दोन दिवसांत येणारा शिश्नदाह किंवा योनिदाह (एक प्रकारच्या बुरशीमुळे किंवा एकपेशीय जीवांमुळे-ट्रायकोमोनास) हाही लिंगसांसर्गिक आजारच आहे.

Image result for Sexually Transmitted Diseases

असुरक्षित शरीर संबंधातून अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे सुरक्षित शरीर संबंधच ठेवावे. शिवाय लग्नापूर्वी वधू-वरांची कुंडली तपासण्याऐवजी पालक आणि वधू-वरांनीही रक्ताची तपासणी करण्याचा आग्रह धरावा. तशी सक्तीच व्हावी. अनेक उच्च शिक्षित लग्नापूर्वी रक्ताची चाचणी करतात. या बाबत व्यापक जागृती व्हावी; तसेच शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य करावा.
- डाॅ. दिलीप इंगोले, एमबीबीएस, एमडी (मुंबई)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about Sexually Transmitted Diseases