लातूर जिल्ह्यात शाईच उपलब्ध नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

लातूर - बॅंकांमधून हजार व पाचशेच्या नोटा बदलून देताना शासनाने ग्राहकांच्या हाताला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ही शाईच उपलब्ध न झाल्याने निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सध्या काही शहरांमध्येच या शाईचा वापर केला जात आहे; पण येत्या काही दिवसांत सर्वत्र शाई उपलब्ध होणार आहे. मात्र, बॅंक व्यवहारासाठी शाईचा वापर झाल्यास पालिका निवडणुकीच्या मतदानावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती राजकीय पक्षांना वाटू लागली आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर बॅंकांमध्ये एकच गर्दी उसळली आहे. अनेकजण कमिशनवर या नोटा बदलून देताना दिसत आहेत. वारंवार तेच ते नागरिक नोटा बदलण्यासाठी येऊ नयेत व या प्रकरणी गैरवापर थांबविता यावा म्हणून शासनाने बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला (तर्जनी) शाई लावली जात आहे. मतदानाच्या वेळी शाई लावण्यासाठी याच बोटाचा वापर केला जातो. लातूर जिल्ह्यात औसा, उदगीर, निलंगा व अहमदपूर या चार नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे नोटा बदलण्यासाठी शाई लावली गेली तर मतदानाच्या वेळी त्याचा परिणाम होईल, अशी भीती राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत.

नोटा बदलण्याच्या संदर्भात शासनाने नागरिकांच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल; पण त्याचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी बोट बदलून शाई लावली जाऊ शकते.
पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी.

Web Title: Ink is not available in Latur district

टॅग्स