सावधान...पाेलिसांचे हे वाहन तुमच्यावर ठेवतेय लक्ष

याेगेश सारंगधर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • तीनशे मीटरपर्यंतच्या भरधाव वाहनाचा वेग टिपणार
  • पोलिसांच्या "इंटरसेप्टर' वाहनांचा महामार्गांवर वॉच 
  • नियम माेडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन दंड 
  • हेल्मेट नसणारे, मद्यपी वाहनचालकांवरही कारवाई

औरंगाबाद - महामार्ग पोलिस दलाच्या अत्याधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी तीन "इंटरसेप्टर' अत्याधुनिक वाहने मिळाली असून, मद्यपी, बेशिस्त वाहनचालक, अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर 18 नोव्हेंबरपासून महामार्ग पोलिस इंटरसेप्टरच्या साह्याने कारवाई केली जात आहे. 

स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित आहे. एखादे वाहन भरधाव गेले तर स्पीडगनद्वारे त्याचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळते. या वाहनातील कॅमेरा तीनशे मीटरपर्यंतच्या वाहनाचे छायाचित्र टिपतो. नियम मोडल्यास वाहनमालकाला थेट ई-चलन मिळणार आहे. या माध्यमातून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिसांकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रणांसह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी या वाहनात ब्रेथ ऍनलायझर यंत्रणा आहे. 
 

चारपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांनुसार कमाल वेग (किलाेमीटर)

चारचाकी 90 
जड वाहतूक (ट्रक, टेंपो) 80 
प्रवासी वाहतूक (बस 80 
दुचाकी 70 
रिक्षा 60 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

दुभाजक नसलेल्या महामार्गावरील वाहनांनुसार कमाल वेग (किलाेमीटर)

चारचाकी 70 
जड वाहतूक (ट्रक, टेंपो) 60 
प्रवासी वाहतूक (बस) 60 
दुचाकी 60 
रिक्षा 50

Image may contain: one or more people and outdoor

नगरपालिका क्षेत्रातील मार्गावरील वाहनांनुसार कमाल वेग (किलाेमीटर)

चारचाकी 60 
मालवाहतूक 40 
प्रवासी वाहतूक 50
दुचाकी 50 
रिक्षा 40

हेही वाचा ः या राष्ट्रीय महामार्गांचे चाैपदरीकरण नागरिकांच्या मुळावर

मराठवाडा विभागातील सर्व पोलिस मदत केंद्रांना इंटरसेप्टर यंत्र असणारी वातानुकूलित वाहने दिलेली आहेत. औरंगाबाद, औरंगाबाद शहर व खुलताबाद येथे ही वाहने दिलेली आहेत. अत्याधुनिक असलेल्या या यंत्रात सर्व हालचाली टिपता येणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. 
-नंदिनी चाणपूरकर, पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस विभाग, औरंगाबाद 

इंटरसेप्टर यंत्रातील लेझर गनमुळे महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची गती मोजता येते. यानंतर हे वाहन ठराविक वेगमर्यादेपेक्षा जास्त धावत असल्यास यंत्रात त्याची वेग, त्या वाहनाचे छायाचित्र व नंबर कैद होतो. यानंतर संबंधित वाहनचालकास मोटार वाहन कायद्यानुसार ऑनलाइन एक हजार रुपये दंड आकारला जातो.
- हरेश्‍वर घुगे, पोलिस उपनिरीक्षक, 
महामार्ग पोलिस मदत केंद्र, औरंगाबाद 

हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराचीही नोंद यात होते. सदर वाहनासोबत दारू पिऊन वाहन चालविणारे वाहनचालकांची चाचणी करण्याचे तंत्रही या वाहनात आहे; तसेच वाहनात लावलेली काच किती काळी आहे, हे तपासण्याचेही वेगळे यंत्र वाहनात आहे. 
- आलमगीर शेख, पोलिस उपनिरीक्षक, 
महामार्ग पोलिस मदत केंद्र, औरंगाबाद 

Image may contain: outdoor
तीनशे मीटरपर्यंतच्या वाहनाचा वेग टिपू शकणारे अत्याधुनिक यंत्र. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interceptor Vehicle Watch on Highways