लातूर : संमेलनाध्यक्ष पदासाठी अंतर्गत निवडणूक

सुशांत सांगवे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या नावांपैकी एका नावावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे.

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या नावांपैकी एका नावावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर बैठकीत कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली, कोणाला किती मते मिळाली... हेही जाहीर केले जाणार आहे. या निर्णयामुळे संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया अटळ आहे, हे स्पष्ट होत आहे.

संमेलनाध्यक्ष सन्मानाने निवडला जावा, अशी मागणी साहित्य क्षेत्रातून अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे साहित्य महामंडळाने दीड वर्षांपूर्वी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद केली. शिवाय, डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने संमेलनाध्यक्षपदी निवडही केली; पण साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रत्येक वेळेस एकमत होईलच असे नाही. त्यामुळे महामंडळाने अंतर्गत निवडणुकीचा पर्याय खुला ठेवला आहे. पूर्वी जवळपास एक हजार ७० जण मतदान करत होते. आता अंतर्गत निवडणुकीत १९ जण मतदानाचा हक्क बजावू शकतील.

संमेलनाध्यक्ष पदासाठी घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांकडून वेगवेगळ्या नावांची यादी साहित्य महामंडळातर्फे मागवली जाते; पण महामंडळाच्या बैठकीआधीच यादीतील नावांची चर्चा होत राहते. ती टाळण्यासाठी आणि बैठकीपर्यंत नावे गोपनीय राहण्यासाठी महामंडळाने यंदा बैठकीच्या दिवशीच घटक, समाविष्ट, संलग्न  संस्थांनी आपली नावे महामंडळाकडे द्यायची, असा बदल केला आहे. साहित्यिकांच्या नावांवरून होणाऱ्या उलटसुलट चर्चेला विराम मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीत कोणकोणती नावे संमेलनाध्यक्ष पदासाठी येणार, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

दोन्ही घोषणा उस्मानाबादमध्येच-

आगामी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. तेथेच साहित्य महामंडळाची बैठक रविवारी (ता.22) हाेणार आहे. यात संमेलनाच्या तारखा, संमेलनातील कार्यक्रमांचा प्राथमिक आराखडा ठरवला आहे. संमेलनाध्यक्षांची निवडही याच बैठकीत हाेणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्षांचे नाव आणि संमेलनाच्या तारखा उस्मानाबादमध्येच जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, संमेलन जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संमेलनाध्यक्षपदासाठी येणारी नावे आम्ही बैठकी दिवशी स्वीकारणार आहोत. ती लगेच बैठकीत ठेवली जातील. त्यावर चर्चा होईल. एकमत झाले नाही तर निवडणूक घेऊन संमेलनाध्यक्ष ठरवले जातील. संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया नवी असली तरी निवडणूक अटळ आहे, हे समजून घ्यायला हवे.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internal election for the post of chairperson on sahitya sanmelan