तीन पिढ्यांपासून जपताहेत रुग्णसेवेचा वारसा

Aswale-Family
Aswale-Family

औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो.

रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक उदाहरण म्हणजे आजी, आई अन्‌ आता मुलींनीही हे व्रत स्वीकारले आहे. आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती आणि जागतिक परिचारिका दिनानिमित्त त्या परिवारांशी ‘सकाळ’ने याविषयी संवाद साधला.

कुटुंबातील सहा जण सेवेत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्रीरोग विभागाच्या शस्त्रागाराच्या परिसेविका (इंचार्ज) सुनीता डॅनियल अस्वले १९९५ पासून रुग्णसेवेत आहेत. त्यांच्या आई मेबल दयानंद ढिलपे या मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमधून ट्रेनिंग घेऊन अंबाजोगाई येथे अधिपरिचारिका, परभणीला परिसेविका; तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे अधिसेविका (मेट्रेन) म्हणून १९९६ला निवृत्त झाल्या. त्यांच्या नणंद वीरमती कामत या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात अधिपरिचारिका आहेत. तर, सुनीता यांच्या तिन्ही मुलींनीही नर्सिंगचेच करिअर निवडल्याचे त्यांनी सांगितले.

सुनीता यांचे पती डॅनियल व्हेरॉक इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या हुद्यावर आहेत. त्यांची मोठी मुलगी ॲनी महापालिकेत स्टाफ नर्स म्हणून टाऊन हॉल येथे कार्यरत आहे. तिच्यापेक्षा लहान मुलगी ग्लोरिया नर्स बनली. मात्र, ती ट्यूटरचा पोस्ट बी.एस्सी. करत आहे. तिचा येत्या जूनमध्ये हा कोर्स पूर्ण होईल. तर, तिसरी मुलगी लविना एमजीएम येथे बी.एस्सी. नर्सिंगच्या चौथ्या वर्षाला आहे. तिचेही नर्सिंगचे शिक्षण जूनमध्ये पूर्ण होईल. घरातील सर्वच या क्षेत्रात आले कारण आईपासून आम्हाला या क्षेत्राची गोडी लागली. इतर व्यवसायापेक्षा नर्सिंगमध्ये प्रत्यक्ष सेवेचे मिळणारे समाधान असल्याचे सुनीता विनम्रपणे सांगतात.

अवघे कुटुंब रमले रुग्णसेवेत!
‘गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही पती-पत्नी घाटीत रुग्णसेवा करतोय. इथे अगदी गावखेड्यातून खूप गरीब कुटुंब उपचारासाठी मोठ्या आशेने येतात. त्यांना सेवा देत असताना त्यांच्याशी सहानुभूतिपूर्वक काम करण्याची बांधिलकी आम्ही जपतो. अभिजित आणि प्रणित ही आमची मुलेही हाच वारसा पुढे चालवत आहेत,’’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअंतर्गत असलेल्या परिचर्या महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशक रमेश शिंदे मोठ्या अभिमानाने सांगत होते. 

मूळचे गंगापूर तालुक्‍यातील सिद्धापूरचे रहिवासी असलेल्या रमेश शिंदे यांनी घाटीतून वर्ष १९८६ ते ८९ या काळात प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून गेली तीस वर्षे ते रुग्णसेवेचा वसा चालवत आहेत. सोलापूर आणि लातूर येथेही काही काळ त्यांनी सेवा दिली. अधिपरिचारिका म्हणून काम करतानाच त्यांनी वर्ष १९९८ ला मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण केले. वर्ष २००२ मध्ये त्यांनी परिचर्या महाविद्यालयात पाठ्यनिर्देशक म्हणून जबाबदारी स्वीकारली. सेवाकाळातच वर्ष २०११ मध्ये नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एम.एस्सी. नर्सिंग पूर्ण केले; शिवाय आता वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून ते पीएच.डी.चे संशोधनही करीत आहेत. सायकियाट्रिक नर्सिंग हा त्यांचा विशेष प्रावीण्याचा विषय आहे.

त्यांच्या पत्नी पंचशीला यांनी घाटीतूनच वर्ष १९८४ ला ट्रेनिंग पूर्ण केले. तेव्हापासून वर्ष २००९ पर्यंत अधिपरिचारिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी दोन वर्षांचा पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. आता वर्ष २०१० पासून पाठ्यनिर्देशिका म्हणून त्या काम पाहत आहेत. मुंबईच्या नवाब अलियावरजंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग ॲण्ड हॅंडिकॅप येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला त्यांचा थोरला मुलगा अभिजित श्रवण व भाषावाचातज्ज्ञ म्हणून काम करत आहे. तसेच धाकटा मुलगा प्रणित हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिचर्या महाविद्यालयातून बी.एस्सी. नर्सिंगच्या चौथ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. आता लवकरच तोही अधिपरिचारक म्हणून काम करेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com