घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला लातूरात अटक

हरी तुगावकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

या टोळीकडून अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान या टोळीचा तपास करण्यासाठी तेलंगाना पोलिस येथे दाखल झाले आहेत.

लातूर : महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक राज्यात घरफोड्या व चोऱ्या
करणारी आंतरराज्यीय गुन्हेगाराच्या टोळीला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता. ११) रात्री अटक केली आहे. या टोळीला रविवारी (ता. १२) येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. या टोळीकडून अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान या टोळीचा तपास करण्यासाठी तेलंगाना पोलिस येथे दाखल झाले आहेत.

किनगाव (ता. अहमदपूर) येथे ता. २५ जुलै रोजी विठ्ठल संभाजी बोडके हे आपले राहते घरी कुटुंबियासह झोलपे असता अज्ञात चोरटयांनी घराचे भिंतीवरून चढून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील दहा लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी किनगाव पोलिस ठाण्यात गु्न्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते. श्री. माने यांच्या सूचनेवरून पोलिस निरिक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलिस अंगद कोतवाड, श्री. सूर्यवंशी, राम गवारे, युसूफ शेख, राजेंद्र टेकाळे, नामदेव पाटील, बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, प्रशांत स्वामी, अभिमन्यू सोनटक्के, नागनाथ जांभळे तसेच सायबर सेलचे राजेंद्र कंचे, यशपाल कांबळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने लातूर तसेच परभणी, नांदेड जिल्ह्यात तपास केला. हा गुन्हा मोहन उर्फ छोटा मोहन बापुराव भोसले (रा. कुरळा, ता. कंधार, जि. नांदेड) याच्या टोळीने केल्या असल्याचे तपासात पुढे आले. या टोळीत संतोष उर्फ चॉकेलट्या बापुराव भोसले, अरविंद उर्फ मोहन उर्फ मोठा मोहन उर्फ दातऱया उर्फ साखऱया बापुराव भोसले (रा. कुरळा, ता. कंधार, जि. नांदेड), मंगल ज्ञानेश्वर चव्हाण (रा. सांगवी, ता. नांदेड) यांचा समावेश होता. गु्न्हा केल्यानंतर ही टोळी कर्नाटक राज्यात पळून गेली होती. पोलिसांनी कर्नाटकात जावून या टोळीला अटक केली आहे. या टोळीने लातूर, उदगीर, देवणी येथे तसेच तेलंगना व कर्नाटकात गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघ़डकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियमन (मोक्का) अन्वये गुन्हा दाखल आहे. ही टोळी तीन राज्यात क्रियाशील असून त्यांच्या मागावर तेलंगना व कर्नाटकातील पोलिसही आहेत. रविवारी दुपारी या टोळीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान तेलंगनाचे पोलिस तपासासाठी लातुरात दाखल झाले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The interstate theif gang was arrested in Latur