औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 72 इच्छुकांच्या मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 72 इच्छुकांनी सोमवारी (ता. 22) मुलाखती दिल्या.

औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 72 इच्छुकांनी सोमवारी (ता. 22) मुलाखती दिल्या. वैजापूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांच्यासह अनेकांचा यात समावेश होता. 

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक अविनाश आदिक, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी इच्छुकांचे प्रत्यक्ष व ऑनलाइन अर्ज भरून घेतल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी राष्ट्रवादी भवनात घेण्यात आल्या. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत मुलाखती देण्यासाठी जिल्हाभरातील 72 इच्छुकांनी हजेरी लावली होती. सरासरी प्रत्येक मतदारसंघातून आठ इच्छुक असल्याचे यावरून समोर आले आहे. 

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिकटगावकर व अभय चिकटगावकर या काका-पुतण्यांनी मुलाखत दिली. पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी पक्षाकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आघाडीमध्ये शहरातील मध्य वगळता पश्‍चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघ, तर ग्रामीणमधील गंगापूर वगळता इतर पाच मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहेत. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी दोघेही स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीला एकमेव वैजापूर विधानसभा मतदारसंघात यश मिळाले होते. चिकटगावकर यांनी मोदी लाटेत शिवसेनेचा पराभव करीत हा मतदारसंघ खेचून आणलेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews of aspirants in the NCP 72 in Aurangabad district