हरिभाऊ बागडे, अतुल सावेंच्या मतदारसंघात अनेक इच्छुक, भाजपने घेतल्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नऊ मतदारसंघांसाठी 56 इच्छुकांनी दिल्या मुलाखती 

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी तब्बल 56 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. वाळूजच्या हायटेक अभियांत्रिकी महाविद्यायात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या मुलाखती घेतल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघांतील इच्छुकांची संख्या वाढल्याचे आजच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. 

सध्या विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. राज्यमंत्री सावे यांच्या पूर्वमधून म्हाडाचे सभापती तथा भाजप कामगार मोर्चाचे संजय केणेकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय मध्य विधानसभा मतदारसंघासाठीदेखील त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या फुलंब्रीमधील इच्छुकांची संख्याही मोठी आहे. युतीमध्ये पूर्व, फुलंब्री, सिल्लोड हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येतात, तर गंगापूरमध्ये गेल्या निवडणुकीत प्रशांत बंब हे भाजपकडून निवडून आले होते. या व्यतिरिक्त शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये लढण्यास इच्छुक असलेल्यांची संख्यासुद्धा कमी नाही. शहरातील पश्‍चिम मतदारसंघातून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे, गजानन नांदूरकर, उत्तम अंभोरे यांनी मुलाखती दिल्या. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, विद्यमान आमदार संजय शिरसाट आहेत. मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. 

वर्ष 2014 मध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यामुळे या मतदारसंघातून एमआयएमची एन्ट्री झाली होती. आता भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी इथून लढण्याची तयारी केली आहे. तनवाणी यांच्याशिवाय संजय केणेकर, अनिल मकरिये यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 
 
यांनी दिल्या मुलाखती 

  • औरंगाबाद मध्य आणि पूर्व - किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, अनिल मकरिये तसेच औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, संजय केणेकर यांनी मुलाखती दिल्या. हिंगोलीचे पालकमंत्री असलेले अतुल सावे यांनी यावेळी फोनवरून संपर्क साधला.  
  • औरंगाबाद पश्‍चिम - राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे, पंकज भारसाखळे, गजानन नांदूरकर, उत्तम अंभोरे.  
  • वैजापूर - एकनाथराव जाधव, नारायण तुपे, दिनेश परदेशी, कल्याण गोरडे, ज्ञानेश्वर जगताप, कैलास पवार, नबी पटेल, मोहन आहेर, कचरू डिके, प्रशांत इंगळे. 
  • कन्नड - संजय खंबायेते, संजय गव्हाणे, किशोर आबा पवार, सुरेश आण्णा गजुराने, बन्सी निकम. 
  • गंगापूर - आमदार प्रशांत बंब, किशोर धनायत, दिलीप बनकर. 
  • सिल्लोड - सुरेश बनकर, सांडू पाटील लोखंडे, श्रीरंग पाटील साळवे, ज्ञानेश्वर मोठे, राजेंद्र जैस्वाल, इद्रिस मुलतानी, अशोक गरुड, सुनील मिरकर, पुष्पाताई काळे, किरण जैस्वाल. 
  • फुलंब्री - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अनुराधा चव्हाण, विजय औताडे, प्रदीप पाटील, भगवान घडामोडे. 
  • पैठण - तुषार शिसोदे, सुनील शिंदे, दत्ता गोर्डे, कांताराव औटे, कल्याणराव गायकवाड, लक्ष्मण औटे, रेखा कुलकर्णी, कांचनकुमार चाटे, ऍड. बद्रीनाथ भुमरे, राजेंद्र फड, सूरज लोळगे, योगेश सोसाटे, गोपीनाथ वाघ. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews by BJP