
साडे सातशे लाभार्थ्यावर कारवाईच्या तहसीलदारांची नोटीस, लाभार्थ्यात खळबळ
घनसावंगी (जि.जालना) : केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत आयकर भरणारे व्यक्तींचा समावेश होत नसतो. तरी देखील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालूक्यातील साडेसातशे नागरिकांनी आयकर भरीत असतांना या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून अनुदान परत करण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मागील वर्षी 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. सदर योजनेसाठी पात्र कुटुंबास प्रतिवर्ष सहा हजार रुपये इतका लाभ हप्त्यात देण्यात येतो. या योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र आहे यांची माहीती प्रसारमाध्यमे जसे वृत्तपत्रे गाव दंवडी, केबल, टीव्ही, प्रसिद्धी पत्रके इत्यादीव्दारे केंद्र शासन व राज्य शासनामार्फत तहसील कार्यालय घनसावंगी यांच्यावतीने जनतेपर्यत पोहचविण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संस्थात्मक जमीन धारण करणारी व्यक्ती, संवैधानीक पदे धारण करणारे आजी व माजी व्यक्ती, आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपलिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्यशासनाचे सर्व कार्यरत निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थाचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट-ड वर्गातील कर्मचारी, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती, पती किंवा पत्नीचे नाव योजनेत असल्यास दोन्हीपैकी एक अपात्र असे अपात्रतेचे निकष आहेत. आयकर भरत असल्यामुळे योजनेसाठी पात्र नसणार्या परंतू शासनाकडून माहीती दडवून ठेवून बेकायदेशीररित्या नोंदणी करून लाभ घेणार्या व्यक्तीची यादी जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत प्राप्त झाली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
घनसावंगी तालूक्यात आयकर भरीत असलेल्या व पीएम किसान योजनेच्या पात्रतेत न बसणाऱ्या साडे-सातशे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे दिसून समोर आले आहे. त्यामुळे आजपर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत प्राप्त रक्कम विहित पद्धतीने शासनास परत करण्यासाठी आपल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक या पैकी जे पालक अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधावा अन्यथा अशी रक्कम त्यांच्याकडून सक्तीने वसूल करण्यात येईल. तसेच शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी भा.द.वी 1860 च्या कलम 120 व 420 नुसार गुन्हा नोद का करण्यात येऊ नये यांचा (ता.नऊ) तहसीलदार घनसावंगी यांच्या समक्ष खुलासा करावा अन्यथा आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी त्यांना पाठविण्यात आलेल्या नोंटीसीव्दारे सूचीत केले आहे.
बोगस लाभार्थ्यावर ही पुढील टप्प्यात कारवाई
मागील महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत गावनिहाय शिबिर घेऊन या योजनेतील पात्र अपात्र निकषानुसार बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यांची छाणनी करण्यात येत असून त्यांचा आकडा अद्याप काढण्यात आला नाही त्यांच्याकडून या पद्धतीने अनुदान परत करण्यासह शासनाच्या निकषानुसार कारवाई पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे. - नरेंद्र देशमुख, तहसीलदार, घनसावंगी.
(संपादन-प्रताप अवचार)