बारमाही सिंचनामुळे भूजलावर संकट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

औरंगाबाद - भूजल आणि भूपृष्ठावरील पाण्याची अवस्था सध्या विदारक आहे. उन्हाळी सिंचन वाढल्यामुळे सगळा ताण भूजलावर पडत असून, पाणीपातळी खालावत असल्याचे वास्तव प्रसिद्ध जलकर्मी पोपटराव पवार यांनी कथन केले. भूगर्भातील पाण्याच्या बळावर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी जलसंकट ओढवल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद - भूजल आणि भूपृष्ठावरील पाण्याची अवस्था सध्या विदारक आहे. उन्हाळी सिंचन वाढल्यामुळे सगळा ताण भूजलावर पडत असून, पाणीपातळी खालावत असल्याचे वास्तव प्रसिद्ध जलकर्मी पोपटराव पवार यांनी कथन केले. भूगर्भातील पाण्याच्या बळावर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी जलसंकट ओढवल्याचे ते म्हणाले.

लोकवाङ्‌मय गृह (मुंबई) आणि अक्षरांगण (औरंगाबाद) यांच्या वतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात मंगळवारी (ता.14) पोपटराव पवार यांच्या हस्ते जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे लिखित "पाण्याशप्पथ'चे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर लेखक श्री. पुरंदरे, पुस्तकावर भाष्य करणारे ईश्वर काळे, अनिकेत लोहिया, राजन क्षीरसागर आणि प्रकाशक डॉ. भालचंद्र कानगो होते. निवृत्त तहसीलदार बाबूराव दुधगावकर यांच्या बासरीवादनाने कार्यक्रम सुरू झाला. डॉ.कानगो यांनी प्रास्ताविकात पाण्याबद्दल जागृतीची आवश्‍यकता विशद केली. लेखकाची भूमिका मांडताना प्रा. पुरंदरे म्हणाले, की 2012 ते 2016 हा कालावधी महाराष्ट्रात जलसंकटाचा काळ होता. या दुष्काळात बरेच राजकारण झाले. आता न्यायालयीन प्रक्रियेच्या पूर्ततेअभावी गेले 20 महिने राज्यात एकही सिंचन प्रकल्पास मान्यता मिळालेली नाही. राज्यात पाणी आहे; व्यवस्थापन नाही. नियम आहेत; जलनियमन नाही. प्राधिकरण आहे; काम करावयास कोणी नाही. पाणीचोर घराण्यांची हिरवीगार साम्राज्ये पसरली आहेत. मराठवाडा म्हणून विभागीय स्तरावरच नव्हे, तर नदीखोरे स्तरावर लढा उभारण्याची आवश्‍यकता आहे.

ईश्वर काळे पुस्तकाविषयी म्हणाले, की बदलत्या हवामानापुढे शेतकऱ्यांचे पारंपरिक ज्ञान अपुरे ठरत आहे. अस्मानी संकटांना तोंड देण्यापूर्वी प्रशासनातील सुलतानी प्रश्नांची उकल कशी करायची, हे या पुस्तकातून समजते. अंबाजोगाई येथील "मानवलोक' संस्थेचे सरचिटणीस अनिकेत लोहिया म्हणाले की, नद्यांचे खोलीकरण करताना आपल्या भागात आठ ते दहा फुटांपासूनच पाषाण लागतो. त्यामुळे शिरपूर पॅटर्न अपुरा ठरतो. राजन क्षीरसागर म्हणाले की, हे पुस्तक जलवंचितांच्या हाती दिलेले शस्त्र आहे. जलवाटपातील विषमता दूर करायला ते उपयुक्त ठरेल. सत्ता आणि पाणी यांची सांगड तोडून जलवंचितांना न्याय मिळण्यासाठी काय भूमिका घ्यायची, याचे सूत्र या पुस्तकात दिलेले आहे.

पोपटराव पवार म्हणाले, की अकरावीपासून पदव्युत्तरपर्यंत श्री. पुरंदरे यांचे हे पुस्तक सक्तीचे करावे, असा शासननिर्णय घ्यायला हवा. एकट्या मराठवाड्यात 46 साखर कारखाने आहेत. पण दारू गाळल्याशिवाय साखर कारखाना चालतच नाही, अशी अवस्था आहे. पाणी अडविणे आणि जिरविणे, यावरच चर्चा होते. पण असलेल्या पाण्याचा वापर व्यवस्थित करा, असे सांगण्याची धमक आज सरकारमध्येही नाही. नागरिकांना शिस्त लावण्याचा ताप कोणालाच नको असतो. त्यामुळे हिवरेबाजार, कडवंची, राळेगण सिद्धी या पलीकडे आदर्श गावांची नावे दिसत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. "अक्षरांगण'च्या नीना निकाळजे यांनी आभार मानले.

Web Title: irrigation and aquifer crisis