'होमगार्ड की वेठबिगारी'

सुशांत सांगवे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मी कोण आहे, हे तुम्हाला काय सांगू. होमगार्ड आहे, असं सांगू की वेठबिगारी आहे, हे सांगू. मला कधीही-केंव्हांही कामावर बोलावलं जातं. असे वर्षातून दोन-अडिच महिने भरतात आणि त्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन दिलं जातं. मग तुम्हीच सांगा, आम्ही पोट भरायचं कसं? होमगार्ड असूनसुद्धा आम्हाला अभिमान बाळगता येत नाही. त्यामुळे ही ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागतं, स्वत:साठी, स्वत:च्या कुटूंबासाठी... पानावलेल्या डोळ्यांनी एक होमगार्ड आपली व्यथा मांडत होते.

लातूर : मी कोण आहे, हे तुम्हाला काय सांगू. होमगार्ड आहे, असं सांगू की वेठबिगारी आहे, हे सांगू. मला कधीही-केंव्हांही कामावर बोलावलं जातं. असे वर्षातून दोन-अडिच महिने भरतात आणि त्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन दिलं जातं. मग तुम्हीच सांगा, आम्ही पोट भरायचं कसं? होमगार्ड असूनसुद्धा आम्हाला अभिमान बाळगता येत नाही. त्यामुळे ही ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागतं, स्वत:साठी, स्वत:च्या कुटूंबासाठी... पानावलेल्या डोळ्यांनी एक होमगार्ड आपली व्यथा मांडत होते.

लातूरात एका कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी काही होमगार्डची नेमणूक करण्यात आली होती. तिथे एका होमगार्डशी ‘सकाळ’ने संवाद साधला. आपली व्यथा सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यामुळे आणखी काही होमगार्ड एकत्र आले. त्या प्रत्येकाने आपल्या व्यथांना शब्दरूप देत भावना मोकळ्या केल्या. आम्हाला वर्षाचे 365 दिवस काम दिलेच जात नाही. कधीही बोलावले जाते. तेवढ्याच दिवसाचे चारशे रुपयांप्रमाणे ‘पॉकेटमनी’ या नावाने मानधन दिले जाते. चारशे रूपयातील दोनशे रूपये, हे प्रवासात जातात. असे वर्षातून कामाचे दोन-अडिच महिने भरतात. मग इतक्याशा पैशांत चुल कशी पेटणार, मुलांना काय खाऊ-पिऊ घालणार, त्यांना शिकवायंच की नाही... अशा अनेक प्रश्नांचा डोंगर आमच्यासमोर असतो. त्यामुळे आम्ही आणि इतर सगळ्याच होमगार्डना इतर कामे शोधावी लागतात. त्यामुळे कोणी बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून जातो तर कोणी दिवसरात्र रिक्षा चालवतो. कोणी किराणा दुकानात तर कोणी पिठाच्या गिरणीत हेल्पर म्हणून काम करताना दिसतो. या व्यथा आम्ही कोणाकडे मांडायच्या, असे होमगार्ड सांगत होते.

ना काठी, ना गणवेश
सुरक्षेसाठी आम्हाला तैनात केले जाते; पण हातात साधी काठीही दिली जात नाही. मग आमचा वचक राहणार कसा, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणार कशी? त्यामुळे आम्हाला समोरच्या व्यक्तीला दादा-भाऊ म्हणत परिस्थिती सांभाळावी लागते. काठीच नव्हे सरकारने पाठविलेले गणवेश, बुट असे साहित्यही आमच्यापर्यंत पोचत नाही. नेमणूक झाल्यानंतर जो गणवेश मिळाला होता, तोच गणवेश अजूनही अंगावर आहे. तीन वर्षातून एक गणवेश मिळेल, असा नियम आहे; पण तो दुर्दैवाने कागदावरच आहे, याकडे होमगार्डनी लक्ष वेधून घेतले.

अशी आहे आकडेवारी
राज्यातील होमगार्ड : 42000
लातूरातील होमगार्ड : 1200

या आहेत प्रमुख मागण्या
- मानधन नको, प्रत्येक महिन्यला ठराविक पगार द्या.
- दोन-अडिच महिन्यांपेक्षा वर्षभर हाताला काम द्या.
- सध्या मिळणारे मानधन वेळेवर द्या, गणवेश-काठी द्या.
- पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही होमगार्डला कायम सेवेत घ्या.

Web Title: issues of Homeguard