'मुंडेंच्या स्मारकासाठी 3 जूनचे अल्टिमेटम'

प्रकाश बनकर
शुक्रवार, 3 मे 2019

- गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाच्या उभारणीसाठी केले जातेय जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आत्मदहन करणार आहेत, असा इशारा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यातर्फे देण्यात आला. 

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासंदर्भात बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी (ता.3) पत्रकार परिषद घेत सरकार मुंडे समर्थकांची कशी खेळी करतेय यांची माहिती सांगितली. सानप म्हणाले, 3 जूनला गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. यामुळे त्या दिवशापर्यंत स्मारकाचे काम सुरु होणे गरजेचे आहे. 2 जून 2015 मध्ये तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. खडसे यांनी विशेष लक्ष देत स्मारकाचा भूमिपूजनापर्यंतची तयारी झाली होती. मात्र, खडसे पायउतार झाल्यानंतर 1 डिसेंबर 2016 महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन झाली. या समितीने स्मारकासाठी आतापर्यंत एकही बैठक घेतली नाही.

विशेष म्हणजे या समितीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. तरीही सत्ताधारी स्मारकाचा प्रश्‍न का प्रलंबित ठेवत आहे हेच कळत नाही. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजप घरा-घरात पोहचविला, त्यांची उपेक्षा आता त्यांच्याच पक्षाकडून केली जात असल्याचा आरोपही सानप यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jai Bhavani Mahasangh give Ultimatum of 3 June for Memorial of Gopinath Munde