गोपनीयतेचा भंग केल्यास जेलची हवा : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत  

हरी तुगावकर
Sunday, 29 November 2020

पदवीधर निवडणुकीसाठी लातूर प्रशासन सज्ज 

लातूर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होत आहे. याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान करतानाचे छायाचित्र किंवा व्हीडीओ सोशल मीडियावर टाकल्यास त्या मतदाराला गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी (ता. २९) येथे पत्रकार परिषदेत दिला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या निवडणुकीत ३५ उमेदवार आहेत. मतदारांना पसंतीक्रमांकानुसार मतदान करता येणार आहे. मतदान अवैध ठरू नये याकरिता जनजागृती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्र निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर असणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून मतदारांना केंद्रात सोडले जाणार आहे. मतदारांची थर्मल स्कॅनिंग केली जाणार आहे. यात कोरोनाच्या संदर्भात संशयित आढळून आल्यास त्याचे सर्वांत शेवटी मतदान करून घेतले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या निवडणुकीसाठी ८८ मतदान केंद्र आहेत. याकरिता ८८ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी मतदानाचे साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे पीव्हीआर चौक ते निक्की बार हा रस्ता सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत बंद राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर काय घडते आहे हे पाहण्यासाठी वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. व्हीडीओ शूटिंगही केली जाणार आहे. प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, अशी माहिती जी. श्रीकांत यांनी दिली. राजकीय पक्ष किंवा उमेदवार मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावरही लक्ष ठेवले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवडणुकीसाठी कोरोनाच्या संदर्भात सर्व साहित्य पुरवठा करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. या निवडणुकीसाठी आठ पोलिस उपअधीक्षक, ५० पोलिस निरीक्षक, ४८१ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली. तर ४१ हजार १९० मतदार असल्याचे उपजिल्हाधिकारी श्रीमती शिंदे यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शुद्ध लेखनातील चुकांमुळे घाबरू नका 
मतदार याद्यांमध्ये काही मतदारांचे नाव, आडनाव चुकीचे पडलेले आहे. ही बाब राजकीय पक्षांनीदेखील निदर्शनास आणून दिली आहे. या शुद्ध लेखनाच्या चुका आहेत. त्यामुळे मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांनी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र मतदान केंद्र प्रमुखांना दाखवावे. तशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जी. श्रीकांत यांनी दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jail for violating privacy Collector G Srikanth order