जालना पालिकेला करवसुलीचा घोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जालना - जालना नगरपालिकेला २०१७-१८ आर्थिक वर्षासह मागील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर करांचे एकूण २१ कोटी २२ लाख २८ हजार रुपये रक्कम वसुली करणे आहे. यापैकी सद्यःपरिस्थितीमध्ये नगरपालिकेने आठ कोटी २२ लाख तीन हजार रुपयांचा कर वसूल केला असून, १३ कोटी १५ हजार रुपयांचा कर वसूल करणे आहे. त्यामुळे यावर्षीही संपूर्ण करवसुलीची आशा धूसर झाली आहे.

जालना - जालना नगरपालिकेला २०१७-१८ आर्थिक वर्षासह मागील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर करांचे एकूण २१ कोटी २२ लाख २८ हजार रुपये रक्कम वसुली करणे आहे. यापैकी सद्यःपरिस्थितीमध्ये नगरपालिकेने आठ कोटी २२ लाख तीन हजार रुपयांचा कर वसूल केला असून, १३ कोटी १५ हजार रुपयांचा कर वसूल करणे आहे. त्यामुळे यावर्षीही संपूर्ण करवसुलीची आशा धूसर झाली आहे.

जालना शहरातील नागरिकांकडे मालमत्ता, पाणीपट्टी, शिक्षण, रोहयो कर, वृक्ष व अग्नी कराचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून नगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली. त्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोख बक्षिसे, तर उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानंतर नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी कर वसुलीच्या कामाला लागले. जालना नगरपालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये नऊ कोटी ३५ लाख एक हजार रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्टे होते. त्यापैकी २०१७-१८ मध्ये नगरपालिकेने आतापर्यंत चार कोटी ७८ लाख सहा हजार रुपयांची कर वसुली केली आहे. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पूर्वीची थकबाकी ११ कोटी ८७ लाख १८ हजार रुपये थकीत करापैकी तीन कोटी ४३ लाख ४३ हजार रुपयांची कर वसुली सध्या झाली आहे. या कर वसुलीमध्ये अजून भर पडणार आहे. मात्र, तरी देखील यंदाही कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. याचा परिणाम नगरपालिकेच्या उत्पन्नावर होणार असल्याचे चिन्हे आहेत.

मालमत्ता कराची ६६.१४ टक्के वसुली
जालना नगरपालिकेने मालमत्ता कराची आतापर्यंत ६६.१४ टक्के कर वसुली केली आहे. यामध्ये थकीत मालमत्ता कर हा दोन कोटी ४० लाख ३२ हजार होता. त्यापैकी एक कोटी ८५ लाख तीन हजार रुपयांची कर वसुली झाली आहे. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील चार कोटी १८ लाख ३७ हजार रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दोन कोटी ५० लाख ६५ हजार रुपयांची आतापर्यंत वसुली झाली आहे. मालमत्ता कर वसुलीमध्ये अजून भर पडण्याची शक्‍यता आहे.

जेमतेम पाणीपट्टीचा भरणा
पाच कोटी ४२ लाख ४३ हजार रुपयांची थकीत पाणीपट्टी होती. त्यापैकी आतापर्यंत ९४ लाख  चार हजार रुपयांची वसुली झाली आहे. तर २०१७-१८ मध्ये पाणीपट्टीचे तीन कोटी ५९ लाख सहा हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी एक कोटी ३१ लाख १२ हजार रुपयांची पाणीपट्टी नगरपालिकेने वसूल केली आहे. पाणीपट्टी वसुलीमध्ये अजून भर पडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: jalana marathwada news municipal tax recovery issue