राज्यातील गारपीटग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजार द्या - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

जालना - गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

जालना - गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

चव्हाण म्हणाले, 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विविध पिकांसह द्राक्ष बागा गारपिटीत उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या "एनडीआरएफ'च्या निकषानुसार पिकांना हेक्‍टरी 13 हजार व फळबागांना हेक्‍टरी 18 हजार रुपयांच्या मदतीची तरतूद आहे. मात्र ती अल्प आहे. त्यामुळे सरकारने आधी गारपीटग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.''

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारुदत्ता कोटकस आदी उपस्थित होते. दरम्यान, जालना शहरात पक्षातर्फे कार्यकर्ता शिबिर झाले. चव्हाण यांच्यासह नेत्यांनी मार्गदर्शन केले.

'ड्रोन', उपग्रहाद्वारे करा पंचनामे
कॉंग्रेसच्या नेत्यांनी वंजारी उम्रद, थार, जामवाडी या गावांना भेटी दिल्या व गारपीटग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे ड्रोन कॅमेरा, उपग्रहाद्वारे पंचनामे करावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना भरपाईची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, एक पैसाही शेतकऱ्यांच्या हाती पडलेला नाही. कर्जमाफीतून अपेक्षित उद्देश साध्य झालेला नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणा दमदार असल्या तरी अंमलबजावणी शून्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: jalana news marathwada news hailstorm affected help ashok chavan