महावितरणच्या वसुलीला वीजबिल वाटपाच्या विलंबाचा गतिरोधक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

महावितरणने नेमलेल्या एजन्सीकडून वीजबिले देण्यात आले आहे. एक-दोन टक्के ग्राहकांना वीजबिलांची अडचण आली असेल. परंतु दर महिन्याला वीजबिलाचा एसएमएस वीज ग्राहकांच्या मोबाईल महावितरणकडून देण्यात येतो. त्यामुळे वीजबिलाचा प्रश्‍न येत नाही.
- कैलास हुमणे, कार्यकारी अभियंता, महावितरण, जालना.

महावितरणच्या वसुली कर्मचार्‍यांना नाहक त्रास
वेळेत वीजबिल न मिळाल्याने ग्राहकांना वीजबिलाच्या व्याजाचा आर्थिक भुर्दंड

जालना: महावितरण कंपनीने थकीत वीजबिल वसुलीसाठी कर्मचार्‍यांच्या मागे तगादा लावला आहे. थकीत वीजबिल वसूल करा अन्यथा घरी जा, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. मात्र एजन्सीकडून ग्राहकांना तंतोतंत वीजबिल वेळेत मिळत नसल्याने महावितरणच्या वसुलीला गतिरोधक निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा रोष अनेकदा वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांवर काढला जातो. त्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांना एकीकडे विहीर आणि दुसरीकडे आड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महावितरण कंपनीकडून मीटरची रीडिंग घेऊन ग्राहकांना वीजबिल देण्याचे काम एजन्सी व्दारे केले जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला एजन्सीव्दारे वीज ग्राहकांच्या मीटरची रीडिंग घेऊन त्यांना वेळेत वीजबिल देणे बंधनकारक आहे. या कामासाठी महावितरणकडून एजन्सीला शहरी भागासाठी प्रती ग्राहक साडेसहा रुपये तर ग्रामीण भागासाठी प्रती ग्राहक साडेआठ रुपये  दिले जातात. प्रत्येक सबडिव्हीजनला मीटर रीडिंग आणि वीजबिल वाटपासाठी एक एजन्सी नेमन्यात आली आहे. परंतु अनेकदा मीटरची रीडिंग अंदाजे टाकून वीजबिल देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे ग्राहकांना दरमहा येणार्‍या वीजबिलामध्ये एखाद्या महिन्याच्या वीजबिलात भरमसाठ वाढ होते. तसेच अनेकदा वीजबिल भरण्याची तारीख निघून गेल्यावर वीजबिल ग्राहकांच्या हाती पडतात, असा अनुभव नेहमीच येतात. सध्या मार्चएंड आल्यामुळे महावितरणचे कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थकीत वीजबिलाच्या वसुलीचे काम करीत आहेत. मात्र अनेक ग्राहकांना दोन-तीन महिन्यांपासून वीजबिल  मिळालेच नाहीत. त्यामुळे वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांवर ग्राहकांच्या रोषाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यात अनेक ग्राहकांना तंतोतंत वीजबिल न दिल्याने वसुली कर्मचार्‍यांना नवीन वीजबिल देऊ वसुली करावी लागत आहे. महावितरणकडून एजन्सीला ग्राहकांना वीजबिल देण्यासाठी प्रती ग्राहक पैसे मोजले जातात. मात्र एजन्सीने वेळेत वीजबिल न दिल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलाच्या व्याजाची रक्कम भरण्याची वेळ येते असून महावितरणला ही वसुलीमध्ये अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे.

रीडिंग अंदाजे
शहरातील दत्ता नानाभाऊ करधने या वीज ग्राहकांच्या मीटरची सध्याची रीडिंग पाच हजार 885 आहे. मात्र त्यांना ता. 28 ङ्खेब्रुवारीच्या वीजबिलावर मीटरची रीडिंग सात हजार 972 दाखविली आहे. त्यामुळे त्यांना तब्बल 14 हजार रुपये अधिकचे वीजबिल देऊन एजन्सी मोकळी झाली आहे. दत्ता करधने हे एक प्राथमिक उदाहरण आहे. हीच परिस्थिती सर्व जिल्ह्यात पाहण्यास मिळते.

Web Title: jalana news mseb light bill issue