लोखंडावर घाव घालून भरतात पोटाची खळगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

ढोरसांगवी येथील घिसाडी कुटुंबाला नाही घर, नाही शेती

जळकोट - ढोरसांगवी (ता. जळकोट) येथे घिसाडी समाजाचे एक कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून गाव सोडून लोखंडावर घाव घालून शेतीची अवजारे बनवीत आहेत. आजपर्यंत शासनाच्या कोणत्याही योजनेचा कोणताही लाभ मिळाला नसल्यामुळे वडील व त्यांचा मुलगा पोटाची खळणी भरण्यासाठी गावोगावी जाऊन लोखंडाला आकार देण्याचे काम करीत आहेत.

ढोरसांगवी (ता. जळकोट) येथील श्‍यामराव चव्हाण व त्यांचा मुलगा श्रीमंत चव्हाण यांना गावात राहण्यासाठी घर नाही व शेती नाही. गावात मतदारयादीत नाव आहे; परंतु तेथील पुढाऱ्यांना मतदानाच्या वेळीच या कुटुंबाची गरज भासते. राहण्यासाठी घर नाही. त्यासाठी कोणीही अद्याप त्यांना सहकार्याचा हात दिला नाही.

वडील श्‍यामराव चव्हाण हे तालुक्‍यातील मध्यभागी असलेल्या गावात पाल मांडून शेतीसाठी लागणारे लोखंडी साहित्य तयार करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर मुलगा श्रीमंत हा जळकोट शहरात राहून लोखंडाला आकार देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.

श्‍यामराव यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. तर श्रीमंतला दोन मुले आहेत. वडील-मुलगा घराची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शाळेत गेलेच नाहीत. श्रीमंतची दोन्ही लहान मुले व्यवसायात साथ देत आहेत. सध्या बाजारात शेती अवजारे मोठ्या प्रमाणात आली आहेत. त्यामुळे घिसाडी समाजाच्या कुटुंबाच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या या लोकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शासनाने प्रतेक गोरगरीब कुटुंबाला सहारा मिळावा यासाठी घरकुल योजना काढली; परंतु या समाजाला वीस वर्षांपासून घरकुलाचा लाभ देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. 

मी व माझे वडील गेल्या चाळीस वर्षांपासून लोखंडाला आकार देण्याचे काम करतो. गावात रिकामी जागा आहे; परंतु अद्याप घरकुल मिळाले नाही. आजही उन्हाळा-पावसाळ्यात झोपडी करून त्यात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो आहे.
- श्रीमंत चव्हाण

Web Title: jalkot ghisadi society life