जंगली प्राण्याच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

goat
goat

भोकरदन (जालना): शेतातील गोठयात बांधलेल्या शेळ्यांवर (ता.30) शनिवारी पहाटे जंगली प्राण्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जंगली प्राण्याने 20 पैकी 11 शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना भोकरदन तालुक्यातील देहेड येथे घडली. या घटनेने पशुपालक व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देहेड येथील सुगंधाबाई रतन बावस्कर यांची देहेड शिवारात शेतजमीन आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेतात शेळीपालन सुरू केले होते. यासाठी त्यांनी तार कंपाउंड वळून गोठा तयार केला आहे. या गोठ्यात 20 शेळ्या व इतर काही जनावरे गोठ्याच्या बाजूलाच नेहमी प्रमाणे बांधलेली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे सुगंधाबाई बावस्कर यांचा मुलगा परमेश्वर शेणपाणी करून व दूध घेऊन घराकडे गेला असता. अचानक जंगली प्राण्याने शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करून 20 पैकी 11 शेळ्यांचा अक्षरशः फडशा पाडला.

परमेश्वर हा चहा पाणी घेऊन पुन्हा शेतात आला असता त्याला गोठ्यातील 11 शेळ्या ठार झाल्याचे व 5 शेळ्या गोठ्यात नसल्याचे आढळून आले. ही घटना पाहून घाबरलेल्या मुलाने तात्काळ घरच्यांना कळवले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती भोकरदन येथील वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाचे जी.एम.शिनगारे व सुरंगळी सजाचे तलाठी विजयालक्ष्मी बाळापुरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

दीड ते दोन लाखांचे नुकसान -

दरम्यान या घटनेत शेतकरी महिलेचे साधारण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे. या घटनेतील गायब असलेल्या पाच शेळ्या जंगली प्राण्याने खाल्ल्या की त्या पळून गेल्या याचा मात्र, उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.


हल्ला करणारा प्राणी बिबट्या की लांडगा?

शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारा जंगली प्राणी बिबट्या होता की, लांडगा याबाबत वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संभ्रम दिसून आला. पंचनामा करतांना तो बिबट्या असल्याचे सांगणाऱ्या वनविभागाने मात्र, नंतर त्याचे ठसे व्यवस्थित तपासून तो लांडगा असल्याचे स्पष्ट केले.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com