
Jalna : ...तर बाललैंगिक अत्याचारास बसेल आळा
जालना : बालकांच्या संरक्षणाबाबत भारतात कठोर कायदे आहेत. विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी पालक, मित्रांसोबत शेअर केल्या पाहिजे. तसे झाल्यास बाललैंगिक अत्याचाराला आळा बसेल, असा विश्वास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजली चौधरी- इनामदार यांनी व्यक्त केला.
इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन्स, सेंट्रल, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ( पोस्को) बाबत अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले.
विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पी. पी.भारसाकडे-वाघ, इनरव्हील क्लब होरायझनच्या अध्यक्षा अमृता मिश्री-कोटकर, सचिव वैशाली मत्सावार, ॲड. अश्विनी धन्नावत, दिपाली पाटणी, शोभा इंगळे, शाळेचे सल्लागार पी.सुरेश, कल्याण समिती सदस्य ॲड. महेश धन्नावत, मुख्याध्यापिका शुभ्रा वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. इनामदार म्हणाल्या, की बाल लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आहेत.
त्यामुळे विद्यार्थिंनी न भिता आपल्या सोबत काही अनुचित प्रकार घडला असे तर तो सांगितला पोहिजे. यासाठी पालकांना शिक्षक व जवळच्या मित्रांनी प्रोत्साहन दिले तर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल. पी. पी. भारसाकडे- वाघ यांनी ‘गुड टच आणि बॅड टच’बद्दल सांगून विधी सेवा प्राधिकरणा मार्फत बाल संरक्षण कायदे जनजागृतीसाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.
ॲड. अश्विनी धन्नावत यांनी बालकांनी धाडस करून पोलिसांची मदत घ्यावी असे सांगितले. वैशाली मत्सावार यांनी जलसंधारणा बाबत जनजागृती केली. उमेश बजाज, ॲड. महेश धन्नावत यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शुभ्रा वर्मा यांनी आभार मानले.