Jalna : CCTV चे अजूनही भिजत घोंगडे ; मिळेना निधी जालना शहर हे व्यापारी आणि औद्योगिक शहर आहे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV

Jalna : CCTV चे अजूनही भिजत घोंगडे ; मिळेना निधी

जालना : जालना शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे. पोलिस प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे ही सीसीटीव्हीसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, अंबड, घनसावंगी शहरासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक कोटी २३ लाखांचा निधी पोलिस प्रशासनाला वर्ग झाला आहे. तर शहरातील सीसीटीव्हीसाठी अद्यापि निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सीसीटीव्हीचे भिजत घोंगडे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जालना शहर हे व्यापारी आणि औद्योगिक शहर आहे. त्यामुळे येथे रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे शहरात भररस्त्यात व्यापाऱ्यांसह नागरिकांना चोरट्यांनी लुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अर्थात या गुन्ह्यांचा पोलिस प्रशासनाकडून छडाही लावण्यात आला आहे. मात्र. अशा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस प्रशासनाला तारेवरची कसर करावी लागते. त्याच प्रमुख कारण म्हणजे शहरातील एकाही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नाही.

त्यामुळे अशा गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील किंवा नागरिकांच्या घरासमोरील सीसीटीव्हीचा आधार घेत गुन्हेगारांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची मागणी केली आहे. मात्र, शहरातील सीसीटीव्हीसाठी एका रुपयांचा निधी अद्यापि उपलब्ध झाला नाही.

तर जिल्हा नियोजन समितीने अंबड व घनसावंगी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक कोटी २३ लाखांचा निधी मंजूर केला असून तो पोलिस प्रशासनाला वर्ग केला आहे. अंबड व घनसावंगी शहरातील महत्त्वाच्या चौकांसह बाजारपेठेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

मात्र, अद्यापि हे सीसीटीव्ही बसविण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील सीसीटीव्हीचे भिजते घोंगडे कायम आहे.

अंबड, घनसावंगी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक कोटी २३ लाखांचा निधी आला आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळाला आला आहे. जालना शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी अद्यापि निधी उपलब्ध झालेला नाही.

— एस.बी. तोटे,कार्यालयीन अधीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना