जालना - उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व 

भास्कर बलखंडे 
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

जालना - जालना जिल्ह्यात सोमवारी (ता.26) झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने बाजी मारली. चार नगरपालिकांपैकी अंबड, भोकरदन व परतूर या तीन नगरपालिकेत कॉंग्रेसचे, तर जालना नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. 

जालना - जालना जिल्ह्यात सोमवारी (ता.26) झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने बाजी मारली. चार नगरपालिकांपैकी अंबड, भोकरदन व परतूर या तीन नगरपालिकेत कॉंग्रेसचे, तर जालना नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. 

जालना पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश राऊत पुन्हा उपनगराध्यक्षपदी विराजमन झाले, त्यांना 39, तर भाजपचे राहुल इंगोले यांना 23 मते पडली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने पालिकेत पुन्हा सत्ता मिळविली असली तरीही विकासकामांना निधी मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अनेक वर्षांपासूनचे रखडलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावणे हे दोन्ही पक्षांसमोरील आव्हान असणार आहे. 

अंबडच्या अटीतटीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे केदार भवानीदास कुलकर्णी यांनी 14 मते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अविनाश वडगावकर यांना चार मते मिळाली. येथे कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षाने हातमिळवणी करून उपनगराध्यक्षपद मिळविल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. भोकरदनला कॉंग्रेसचे एकबाल सिद्दिकी यांना 14, तर भाजपचे दीपक बोर्डे यांना 4 मते मिळाली. येथे आमदार संतोष दानवे यांनी प्रयत्न करूनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. येणाऱ्या काळात श्री. दानवे यांना येथे पक्ष वाढीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. परतूर पालिकेत कॉंग्रेसचे रहिमोद्दीन कुरेशी बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी पालिकेत पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता मिळवीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे; परंतु शहराच्या विकासासाठी निधी मिळविण्यासाठी श्री. जेथलिया यांना पालकमंत्री श्री. लोणीकर यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. हे दोन नेते विकासासाठी एकत्र येतील काय? हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगल्याप्रकारे यश मिळविले आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने अंतर्गत मतभेद सोडून अशीच घोडदौड सुरू ठेवली तर भाजप-सेना युतीची मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 

कुठे--- कोण 
जालना ः राजेश राऊत (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
अंबड ः केदार भवानीदास कुलकर्णी (कॉंग्रेस) 
भोकरदन ः एकबाल सिद्दिकी (कॉंग्रेस) 
परतूर ः रहिमोद्दीन कुरेशी (कॉंग्रेस) बिनविरोध 

Web Title: Jalna Congress elections