
Jalna : दामिनी पथकाने रोखले तीन बालविवाह
जालना : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी आयोजित तीन बालविवाह दामिनी पथकाने बुधवारी (ता.१५) रोखले आहेत. जिल्ह्यात गुरूवारी (ता.१६) दोन ठिकाणी तीन विवाह होणार होते. अल्पवयीन मुलीचे विवाह होणार असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली.
त्यानुसार दामिनी पथक, अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखा आणि बाल विकास विभागाने अंबड तालुक्यातील शिरनेर येथील १६ वर्षीय दोन चुलत बहिणींचा गेवराई तालुक्यातील दोन सख्ख्या भावासोबत होणारा विवाह सोहळा रोखला.
शिवाय जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथेही एका १६ वर्षीय मुलीचा विवाह सोहळा रोखण्यात दामिनी पथकाला यश आले आहे. या विवाह सोहळ्यातील तीनही मुली अल्पवयीन असल्याने मुलांच्या पालकांचे समुपदेशन करून हे विवाह रद्द करण्यात आले.
शिवाय शिरनेर (ता.अंबड) दोन मुलींना पालकांसह बालकल्याण समितीसमोर बुधवारी हजर करून त्यांना बालकल्याण समितीच्या आदेशानुसार जालना शहरातील राजगृह येथे सुरक्षितताकामी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही ठिकाणी विवाहाची पूर्वतयारी झाली होती. लग्नाचा मंडप उभारणी आला होता.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक आणि अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक रंजना पाटील, बाल संरक्षण अधिकारी इंगळे, सहायक फौजदार रवी जोशी, हवालदार संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी आदींनी केली.